आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती अर्थात आयसीसीतर्फे आयोजित पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना 18 जूनपासून साऊथॅम्प्टनच्या मैदानावर खेळला जाईल. तिथे भारतीय संघ सर्वोच्च कसोटी किताब जिंकण्याकरिता न्यूझीलंड विरुद्ध दोन हात करील. हा अंतिम सामना खऱ्या अर्थाने केन विलियम्सन आणि विराट कोहली यांचे नेतृत्वगुण तपासणारा ठरणार आहे.
या दोघांपैकी जो नियोजित रणनिती करून मैदानात उतरेल आणि वेळेवर अचूक निर्णय घेईल त्याचाच संघ विजय होईल. कर्णधार म्हणून त्यांच्यात जबरदस्त स्पर्धा आहेच पण दोघांनाही फलंदाज म्हणून मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. हे दोन्ही खेळाडू आपापल्या संघांचे प्रमुख शिलेदार आहेत आणि संघाच्या विजयात यांचे नेहमी योगदान असते.
वर्तमान काळात विराट कोहली आणि केन विलियम्सन या दोघांची तुलना कसोटी क्रिकेटच्या दिग्गज फलंदाजांमध्ये केली जाते. विलियम्सन जरी एक दिग्गज खेळाडू असला, तरी जेव्हा वेळ भारताविरुद्ध कसोटीत फलंदाजी करण्याची येते तेव्हा मात्र त्याच्या फलंदाजीला जास्त बहर येत नाही. भारतीय संघाविरुद्ध कसोटीत त्याच्या प्रदर्शनाचा विचार केल्यास त्याने आतापर्यंत भारताविरुद्धच्या 11 कसोटीच्या 20 डावांमध्ये 36.40 च्या सरासरीने 728 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने 2 शतक देखील झळकावली आहेत. भारतीय संघाविरुद्ध त्याची सर्वोत्तम धावसंख्या 131 आहे. 11 कसोटी सामन्यांत जवळजवळ 37ची सरासरी केन विलियम्सनच्या प्रतिभेला नक्कीच साजेशी नाही.
दुसरीकडे भारतीय कर्णधार विराट कोहलीची न्यूझीलंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन राहिले आहे. त्याने आतापर्यंत न्यूझीलंड संघाविरुद्ध कसोटी क्रिकेट खेळताना 50पेक्षा जास्त सरासरीनेच धावा केल्या आहेत. त्यामुळे ही गोष्ट लक्षात येते की तो या विपक्षी संघाविरुद्ध किती निरंतरपणे धावा करतो आहे. कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध आतापर्यंतच्या 9 कसोटी सामन्यांत एकूण 17 डावांमध्ये 51.53 च्या जबरदस्त सरासरीने तब्बल 773 धावा जोडल्या आहेत. यात कोहलीच्या 3 शतकांचा देखील समावेश आहे. आणि न्यूझीलंडविरुद्ध त्याची सर्वोत्तम धावसंख्या 211 धावा आहेत.
या आकडेवारीवरुण तरी कोहली विलियम्सनपेक्षा सरस ठरल्याचे दिसत आहे. मात्र कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च स्पर्धा असलेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या येत्या अंतिम सामन्यात हे दोघे कसे प्रदर्शन करणार, यावर दोन्ही संघांचे भवितव्य अवलंबून असेल.
महत्वाच्या बातम्या:
शाहिद आफ्रिदीने निवडली ऑल टाईम प्लेइंग इलेव्हन, केवळ एका भारतीय खेळाडूला दिले स्थान
ना स्मिथ, ना कमिन्स! टीम पेनच्या मते हा खेळाडू असेल ऑस्ट्रेलियाचा पुढील कर्णधार
WTC फायनलमध्ये या दोन खेळाडूंना एकत्र खेळतांना पाहण्याची व्हीव्हीएस लक्ष्मण यांची इच्छा