जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधून बाहेर पडल्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार आणि ऑस्ट्रेलियाचा संघ या वर्षाच्या शेवटी खेळल्या जाणाऱ्या एशेस कसोटी मालिकेकडे लक्ष केंद्रित करत आहे. ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण असेल. ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनला भारताकडून मायदेशात सलग दोन कसोटी मालिकेत पराभव स्वीकारावा लागल्यामुळे तो सध्या दबावात आहे. कारण याच पराभवामुळे ऑस्ट्रेलियन संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात जागा मिळाली नाही. यानंतर त्याच्या नेतृत्वावर अनेक प्रश्न उचलले गेले व असेही म्हंटले जात आहे की इंग्लंड विरुद्धची एशेस मालिका कर्णधार म्हणून त्याची शेवटची मालिका असू शकते. त्यामुळेच आता ऑस्ट्रेलियन संघाचा पुढील कर्णधार कोण असेल, यावर चर्चा सुरु झाली आहे.
ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ परत कर्णधारपद घेईल, अशी शक्यता आहे. सध्या कसोटीसाठी कर्णधार म्हणून स्मिथच प्रथम दावेदार आहे. परंतु काही खेळाडूंच्या म्हणण्यानुसार स्मिथच्या हाती नेतृत्व दिल्यास संघ एक पाऊल मागे जाईल. त्यामुळे काही जणांच्या मते पॅट कमिन्स हा योग्य दावेदार असेल. मात्र आता विद्यमान कर्णधार टीम पेनने ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदासाठी एक वेगळेच नाव सुचवले आहे.
‘हा’ असेल ऑस्ट्रेलियाचा भावी कर्णधार
ऑस्ट्रेलियाचा भावी कर्णधार कोण असेल, असा प्रश्न टीम पेनला विचारण्यात आला तेव्हा त्याने उदयोन्मुख फलंदाज मार्नस लॅब्युशेनचे नाव घेतले. तो म्हणाला, मार्नस भविष्यात संघाचा उत्कृष्ट कर्णधार म्हणून सिद्ध होईल. पाकिस्तान विरुद्ध २०१८ मध्ये पदार्पण करणाऱ्या २६ वर्षीय लॅब्युशेनचे वर्चस्व ऑस्ट्रेलिया संघात वाढते आहे. तो कसोटी क्रिकेटमध्ये सध्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा बनवण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.
सोमवारी ब्रिस्बेनच्या पत्रकारांशी बोलताना टीम पेनने सांगितले, “मला वाटते की लॅब्युशे संघासाठी एक चांगला कर्णधार होऊ शकतो. त्याच्याकडे खेळ समजण्याची आणि त्याच्यावर विचार करण्याची चांगली क्षमता आहे. तो एक चांगला खेळाडूही आहे आणि त्याच्या सोबत संघालाही तो उत्साही ठेवतो.”
लॅब्युशेनमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता
टीम पेनने लॅब्युशेनच्या उत्कृष्ट फलंदाजी व्यतिरिक्त सतत शिकण्याच्या इच्छेची देखील स्तुती केली आहे. शिवाय येत्या काळात तो संघासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावेल, असे भाकीत देखील पेनने वर्तवले आहे. तो म्हणाला, “आम्ही आमच्या खेळाबद्दल बोललो तर आमचा पूर्ण संघ आपल्या खेळात सुधारणा करत आहे. लॅब्युशेनही आपल्या खेळात विकास करत आहे. मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या काही वर्षात तो संघाचे नेतृत्व करताना दिसून येईल . त्याच्याकडे संघाला सांभाळण्याची आणि पुढे नेण्याची क्षमता आहे. जर त्याने ही क्षमता वाढवण्याचे प्रयत्न केले तर तो नक्कीच एक महान कर्णधार बनेल.”
महत्वाच्या बातम्या:
फुटवर्क कपल! चहल दांम्पत्याचा नवा डान्स व्हिडिओ आला समोर
या कर्णधाराची छातीठोकपणे भविष्यवाणी, म्हणाला भारतच होईल कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता
न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूने उलगडले संघाच्या विजयाचे रहस्य