राजकोट। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आज(17 जानेवारी) दुसरा वनडे सामना सुरु आहे. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर सुरु असलेल्या या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने मोठा विक्रम केला आहे.
विराटने आज 76 चेंडूत 78 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 6 चौकार मारले. याबरोबरच त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण करण्याचा पराक्रमही केला आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध 4000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करण्याचा टप्पा पार करणारा तो एकूण सातवा खेळाडू ठरला आहे. तर तो भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरनंतरचा दुसराच क्रिकेटपटू ठरला आहे.
विराटच्या आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध 74 सामन्यातील 86 डावात 52.75 च्या सरासरीने 4009 धावा पूर्ण झाल्या आहेत.
तसेच तो ऑस्ट्रेलिया विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 4000 धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाजही आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वात जलद 4000 धावा सचिनने केल्या आहेत. सचिनने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 83 व्या डावात 4000 धावांचा टप्पा पार केला होता.
आज सुरु असलेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 340 धावा केल्या आहेत. भारताकडून विराट व्यतिरिक्त शिखर धवन(96) आणि केएल राहुलने(80) अर्धशतकी खेळी केल्या आहेत.
#आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –
6707 धावा – सचिन तेंडूलकर (110 सामने)
4714 धावा – ब्रायन लारा (82 सामने)
4495 धावा – देसमंड हाईन्स (97 सामने)
4453 धावा – विव रिचर्ड्स (88 सामने)
4063 धावा – डेव्हिड गोवर (74 सामने)
4027 धावा – ग्रॅहम गुच (74 सामने)
4009 धावा – विराट कोहली (74 सामने)
#ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वात जलद 4000 आंतरराष्ट्रीय धावा करणारे क्रिकेटपटू –
83 डाव – सचिन तेंडूलकर
86 डाव – विराट कोहली






