भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर- गावसकर ट्रॉफीतील पहिल्या कसोटीत भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते. भारताचा हा पराभव झाला असतानाच, कर्णधार विराट कोहली पालकत्व रजेमुळे मायदेशी परतणार आहे. विराट भारतात परतणार असला, तरीही तो आपल्या संघाला भारतात राहून मार्गदर्शन व उत्साह वाढवण्याचे काम करेल.
विराट परतणार आहे मायदेशी
ऍडलेड येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या दिवस-रात्र कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाने भारताचा ८ गड्यांनी पराभव केला. भारतीय संघ आपल्या दुसऱ्या डावात पॅट कमिन्स व जोश हेजलवूड यांच्या भेदक मार्यापुढे अवघ्या ३६ धावांवर बाद झाला. ही भारताची आतापर्यंतची कसोटी क्रिकेटमधील सर्वात निच्चांकी धावसंख्या आहे. या कामगिरीनंतर भारतीय संघावर चौफेर टीका होतेय. अशातच, भारताचा कर्णधार विराट कोहली पालकत्व रजेमुळे भारतात परतेल. विराटची पत्नी अनुष्का ही आपल्या पहिल्या बाळाला जानेवारी महिन्यात जन्म देऊ शकते. विराटला त्यावेळी आपल्या पत्नीसोबत राहायचे असल्याने, त्याने बीसीसीआयकडे पालकत्व रजेसाठी अर्ज केला होता. त्याचा हा अर्ज मंजूर झाला आहे.
विराट वाढवेल भारतीय संघाचे मनोबल
विराट मंगळवारी (२२ डिसेंबर) भारताकडे प्रस्थान करेल. तत्पूर्वी, विराटने आपल्या संघ सहकार्यांसोबत मोठी चर्चा केल्याचे म्हटले जात आहे. तसेच, भारतात आल्यानंतरही तो व्हॉट्सऍप आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने आपल्या संघाला मार्गदर्शन करताना दिसेल. विराट त्याचवेळी भारतीय संघाचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्नदेखील करेल.
भारताला सतावणार आहे प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती
विराट मायदेशी परतल्यानंतर त्याच्या जागी अजिंक्य रहाणे भारताचे नेतृत्त्व करेल. भारताला उर्वरित मालिकेत कर्णधार विराट कोहलीसह वेगवान गोलंदाज इशांत शर्मा व मोहम्मद शमी यांची अनुपस्थिती जाणवेल. इशांत आयपीएल दरम्यान दुखापतग्रस्त झाल्याने ऑस्ट्रेलियाला गेला नाही, तर पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात शमीच्या उजव्या हाताला दुखापत झाल्याने तो मालिकेतून बाहेर पडला आहे. अनुभवी रोहित शर्मादेखील फक्त अखेरचे दोनच सामने खेळेल. मालिकेतील दुसरा सामना २६ डिसेंबरपासून मेलबर्नच्या एमसीजी क्रिकेट ग्राउंडवर खेळला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ‘ही’ रणनीती वापरा; गौतम गंभीरचा अजिंक्य रहाणेला सल्ला
‘गेल स्टॉर्म’ पुन्हा येणार; ‘या’ स्पर्धेतून ख्रिस गेल करणार पुनरागमन
…म्हणून धोनीच्या शेतातील भाज्यांची किंमत आहे स्वस्त; घ्या जाणून