तिरुवनंतपुरम । रविवारी आपला २९वा वाढदिवस साजरा केलेल्या कर्णधार विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्यासाठी केवळ १९८ धावांची गरज आहे.
सध्या विराटच्या नावावर ५० टी२० डावात १९४३ धावा आहेत तर ब्रेंडन मॅककुलूमच्या नावावर ७० डावात २१४० धावा आहेत.
जर विराट न्यूझीलंड किंवा श्रीलंका मालिकेत हा विक्रम करू शकला तर तो सचिनएवढाच मोठा एक विक्रम करणार आहे. सचिन वनडेत आणि कसोटीत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. विराट एवढ्या धावा करू शकला तर तो टी२०मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनेल.
असं झालं तर तिन्ही प्रकारात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू भारतीय होतील आणि इतिहासात पहिल्यांदाच असे होईल. कारण जेव्हा टी२० क्रिकेट सुरु झाले तेव्हा कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम अॅलन बॉर्डर यांच्या नावावर होता. त्यामुळे एकाच वेळी सर्व विक्रम भारताकडे असण्याचा विक्रम याबरोबर होऊ शकतो.
तसेच आजच्या सामन्यात कोहलीने जर ५७ धावा केल्या तर टी२० इतिहासात २००० धावा करणारा तो केवळ दुसरा खेळाडू बनेल.