भारताचा महान माजी कर्णधार सौरव गांगुलीने भारताचा सध्याचा कर्णधार विराट कोहलीला त्याचा फलंदाजीचा क्रम बदलण्याचा सल्ला दिला आहे.
याबद्दल गांगुली इंग्लंडमध्ये सोमवारी त्याच्या अ सेंच्यूरी इज नॉट इनफ या पुस्तक प्रकाशनावेळी बोलत होता.
गांगुलीच्या मते विराटने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केल्याने भारताच्या फलंदाजीला आणखी मजबुतपणा येईल. तसेच गांगुली म्हणाला, ‘जर नुकत्याच झालेल्या टी20 मालिकेकडे पाहिले तर मला वाटते भारताने योग्य फलंदाजी क्रमवारी ठेवली होती.
केएल राहुल तिसऱ्या क्रमांकावर आणि विराट चौथ्या क्रमांकावर योग्य होते आणि मला वाटते वनडेमध्येही ही क्रमवारी योग्य ठरेल. मला वाटते विराटही पुढे होणाऱ्या मालिकांसाठी असेच करेल.’
याबरोबरच गांगुली इंग्लंड संघाबद्दल म्हणाला की त्यांच्याकडे आक्रमक फलंदाज आहेत पण त्याच्या गोलंदाजीत कमतरता असल्याने भारतीय संघाला याचा फायदा होऊ शकतो.
भारतीय संघाने जुलै 2017 पासून वनडेत चौथ्या क्रमांकावर जवळजवळ 6 खेळाडूंना खेळवले आहे. यात केएल राहुल,केदार जाधव, मनिष पांडे, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक आणि अजिंक्य रहाणे हे खेळाडू चौथ्या क्रमांकावर खेळले आहेत.
भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील वनडे मालिका 12 जुलैपासून सुरु होणार आहे. या मालिकेत भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध 3 सामने खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
-जबरदस्त गोलंदाजी करणाऱ्या भारताच्या युवा गोलंदाजाचे मास्टर ब्लास्टरकडून कौतुक
-एमएस धोनी म्हणतो, 300 एकदिवसीय सामने खेळलोय; मी वेडा आहे का?
-बोगस पदवी प्रमाणपत्र सादर करणाऱ्या क्रिकेटर हरमनप्रीत कौरला मोठा दिलासा