---Advertisement---

भारतीय महिला टेनिसच्या क्षितिजावर ‘ऐश्वर्या’च्या रूपात नवीन तारा, कोल्हापूरच्या लेकीची विम्बल्डनपर्यंत मजल

Aishwarya-Jadhav
---Advertisement---

भारतात महिला टेनिस हा शब्द उचलला तरी त्याला समांतर एकच नाव सर्वांच्या ओठी येतं ते म्हणजे सानिया मिर्झा हिचं. मागील जवळपास दोन दशकांपासून सानिया भारताच्या महिला टेनिसच वैभव म्हणून जगभरात मिरवतेय. नुकत्याच संपलेल्या विम्बल्डनमध्ये डबल्स प्रकारात हरल्यानंतर तिने आता पुन्हा विम्बल्डन खेळणार नसल्याचे संकेत दिले. सानियाने अमेरिकन ओपनच्या रूपात शेवटचा ग्रँडस्लॅम खेळला. एकीकडे सानियाचे करिअर संपले असतानाच भारतीय महिला टेनिसच्या क्षितिजावर नवीन तारा उगवतोय. ती टेनिसपटू म्हणजे आता जिचं नाव सर्वांच्या तोंडी आहे अशी कोल्हापूरची ऐश्वर्या जाधव.

विम्बल्डन 2022च्या अंडर-14मध्ये चॅम्पियनशिपमध्ये खेळत असलेली एकमेव भारतीय ऐश्वर्याला पहिल्या राऊंडमध्ये निसटता पराभव स्वीकारल्याने स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले. मात्र, तरीदेखील तिच्या झुंजार खेळाने विम्बल्डनच्या कोर्टवरील सर्वांची मने जिंकली. एशियन संघाकडून सहभागी झालेली ऐश्वर्या भारतीय टेनिसचा भविष्य आहे, असं तिच्या नॅशनल कोच अमृता बॅनर्जी म्हणतायेत.

कोल्हापूरला खेळाचे माहेरघर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. छत्रपती शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रय इथेच दिला. फुटबॉलही इथे मोठ्या प्रमाणात खेळला जातो. इतरही खेळांचे अनेक मैदानी आणि अकॅडमी आपल्याला कोल्हापुरात दिसून येतात. अशाच टेनिससारख्या‌ एका महागड्या खेळात करिअर करायचं स्वप्न ऐश्वर्या जाधव आणि तिचे वडील दयानंद जाधव यांनी पाहिलं. वयाच्या अगदी पाचव्या वर्षापासून तिच्या हातात रॅकेट आलेली. 2017 पासून तिचा टूर्नामेंट्स खेळण्याचा प्रवास सुरू झाला. 2008 साली जन्मलेली ऐश्वर्या कोल्हापूरच्या पन्हाळ्यातल्या युवलुज गावाची आहे, पण ऐश्वर्याच्या करियरच्या दृष्टीने तिच्या आई-वडिलांनी कोल्हापूरमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. दोन तास फिटनेस आणि चार पाच तास टेनिसचा सराव असं तिचं एकूण शेड्युल असते. अर्षद देसाई आणि मनाल देसाई यांनीच तिला टेनिसचे धडे दिले. कोल्हापूर लॉन टेनिस असोसिएशन आणि ती शिकत असलेल्या छत्रपती शाहू विद्यालय यांनीदेखील तिला तितकेच सहकार्य.

ऐश्वर्याच्या यशाचा आलेख चांगला चढता राहिलाय. जेव्हापासून ती स्पर्धांमध्ये उतरते तेव्हापासून कमीत कमी सेमी फायनलपर्यंत तरी ती पोहोचलीये. सध्या अंडर 14 नॅशनल चॅम्पियन असलेली ऐश्वर्या या वयोगटात भारतातील नंबर वनची टेनिसपटू आहे. 14 वर्षांची ऐश्वर्या त्याचबरोबरीने अंडर 16 वयोगटातही तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलीये‌‌.

दोन महिन्यांपूर्वी ऑल इंडिया टेनिस असोसिएशन म्हणजेच एआयटीएफने 14 वर्षांखालच्या मुलींची स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत काही जागतिक टेनिसपटूही सहभागी झाले होते. या स्पर्धेत ऐश्वर्याने चार मॅच जिंकून सेमी फायनलमध्ये धडक मारली होती, पण तिला फायनल खेळता आली नाही. याच कामगिरीच्या जोरावर ऐश्वर्याची विम्बलडनसाठी निवड झाली.

जूनियर विम्बलडन सुरू होण्याआधी ऐश्वर्याने 4 ते 6 जुलैदरम्यान विशेष ट्रेनिंग कॅम्पमध्येही सहभाग नोंदवला. क्ले कोर्ट आणि सिंथेटिक कोर्टवर खेळायची सवय असलेली ऐश्वर्या पहिल्यांदाच ग्रास कोर्टवर खेळत होती. ऐश्वर्या विम्बलडननंतर बेल्जियम, पॅरिस आणि जर्मनीमध्येही युरोप ज्युनिअर टेनीस स्पर्धेमध्ये सहभागी होईल. आज विम्बल्डन ज्युनियरमध्ये पहिल्या प्रयत्नात तिला अपयश आले असले, तरी भारताच्या एका नव्या पिढीचे ऐश्वर्या प्रतिनिधित्व करण्यासाठी एकदम तयार आहे. भविष्यात ऐश्वर्या भारतीय टेनिस ऐश्वर्य आणखीन वाढवेल यात कोणालाही शंका नाही.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेट कोचिंगला आधुनिकतेचा टच देणारे ‘बॉब वूल्मर’, पाकिस्तानचे हेड कोच असतानाच झालेला रहस्यमयी मृत्यू
Monkeygate Scandal: भारतीय खेळाडू, बीसीसीआय, कोर्ट आणि मीडियाला सांभाळत भज्जीला वाचवणारा ‘डॉक्टर’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---