पुणे । केपीआयटी एमएसएलटीए चॅलेंजर्स 80व्या टेनिस स्पर्धा मालिकेत तब्बल 19 देशांमधील टेनिस खेळाडू सहभागी होणार असून याशिवाय 19 भारतीय खेळाडूंचा विक्रमी सहभाग या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरणार आहे.
मुख्य ड्रॉमध्ये खेळणाऱ्या 19 भारतीय खेळाडूंचे नेतृत्व अव्वल मानांकित भारतीय खेळाडू प्रजनेश गुन्नेश्वरन करणार असून एका यजमान देशाचे खेळाडू एकाचवेळी एकाच स्पर्धेत सहभागी होण्याची जगातील कोणत्याही चॅलेंजर स्पर्धेतील ही पहिलीच वेळ आहे.
या स्पर्धेच्या प्रवेशिका यादीमध्ये चार खेळाडूंसह जपान भारतापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर असून तीन खेळाडूंसह रशिया तिसऱ्या स्थानावर आहे.
स्पर्धेत भारतीय खेळाडूंमध्ये प्रजनेश गुन्नेश्वरन, सुमित नागल, रामकुमार रामनाथन, ससीकुमार मुकुंद यांना मुख्य ड्रॉमध्ये मानांकन मिळाले आहे.
या स्पर्धेमुळे भारतीय खेळाडूंना या संपूर्ण वर्षातील अन्य कोणत्याही आंतरराष्ट्रीय व्यावयसायिक टेनिस स्पर्धेत मिळाली नव्हती अशी मौल्यवान एटीपी गुणांची कमाई करण्याची संधी एकाच स्पर्धेत मिळणार आहे. एकाचवेळी किमान 10 भारतीय खेळाडूंना एटीपी गुण मिळविणे शक्य होणार असून त्यामुळे व्यावसायिक मानांकन मिळणेही शक्य होणार असल्याचे पीएमडीटीएचे अध्यक्ष आणि आयोजन समितीचे अध्यक्ष, केपीआयटीचे व्यवस्थापकीय संचालक किशोर पाटील यांनी सांगितले.
ते पुढे म्हणालेकि, मुख्य ड्रॉमधील सर्व मानांकित खेळाडूंना पुढे चाल देण्यात आली असून अन्य खेळाडूंमध्ये काही अत्यांत रंगतदार व चुरशीच्या लढती रंगणार आहेत.
त्यात पाकिस्तान विरुद्धच्या डेव्हिस करंडक लढतीत भारतीय संघात समावेश झालेल्या खेळाडूंसह मनीष सुरेशकुमार विरुद्ध अन्वीत बेंद्रे, अर्जुन कढे बिरुद सिद्धार्थ रावत या लढती लक्षवेधी ठरणार आहेत. याशिवाय उप-उपांत्यपूर्व फेरीत शशी कुमार मुकुंद विरुद्ध साकेत मायनेनी यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.
कोबे, जपान येथील चॅलेंजर स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या पुरव राजा आणि रामकुमार रामनाथन यांना दुहेरीत अग्रमानांकन देण्यात आले असून यामध्ये आणखी 6 भारतीय जोड्याचा समावेश आहे.
स्पर्धेच्या सामन्यांना दुपारी 12 वाजता प्रारंभ होणार असून उर्वरित सामने प्रकाशझोतात होणार आहेत. पहिल्या फेरीतील विजेत्या खेळाडूंना 3 गुण मिळणार आहेत.