आयपीएलच्या या हंगामात एकामागून एक अटीतटीचे सामने पाहायला मिळत आहेत. सर्व संघांमध्ये जोरदार स्पर्धा पाहायला मिळत आहे. या हंगामात भारतीय खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू कुलदीप यादव कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कुलदीप हा केकेआरचा महत्त्वाचा भाग आहे. परंतु त्याला मागील दोन सामन्यात संधी मिळालेली नाही. केकेआरचा गोलंदाजी प्रशिक्षक काइल मिल्सने याबाबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.
राहुल त्रिपाठीला दिली संधी
केकेआरच्या संघ व्यवस्थापनाने कुलदीप यादवच्या जागी फलंदाज राहुल त्रिपाठीला संधी दिली आहे. त्याच्याऐवजी युवा फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती गोलंदाजी करत आहे. केकेआर संघात सुनील नरेन हा दुसरा फिरकी गोलंदाज आहे. कुलदीप यादवला संधी दिली नसल्यामुळे अनेक क्रिकेटप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
कुलदीप आहे सर्वोत्कृष्ट फिरकीपटू
कुलदीप यादवचे कौतुक करताना काइल मिल्स म्हणाला, “कुलदीप हा जगातील सर्वोत्कृष्ट फिरकीपटू आहे, परंतु मैदान आणि संघांचे उत्तम संयोजन या सर्वांचा विचार करता, त्याला प्लेयिंग इलेव्हनमध्ये संधी दिली नाही.”
कुलदीप संघात देत आहे योगदान
पुढे बोलताना तो म्हणाला, “ही एक चांगली स्पर्धा आहे. आमच्याकडे एक मजबूत संघ आहे. कुलदीप कदाचित दोन सामने खेळला नसेल, पण तो संघात आपले योगदान देत आहे. संघात प्रत्येकजण एकमेकांना मदत करतात ही एक चांगली संस्कृती आहे.”