येत्या काही दिवसात भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये मर्यादित षटकांची मालिका रंगणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला ३ वनडे आणि ३ टी-२० सामने खेळायचे आहेत. यासाठी फिरकीपटू कुलदीप यादव याला देखील भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या कुलदीप यादवकडे भारतीय संघात जोरदार पुनरागमन करण्याची संधी असणार आहे.
कुलदीपसाठी श्रीलंका दौरा ठरू शकते शेवटची संधी
कुलदीप आगामी श्रीलंका दौऱ्यावर चांगली कामगिरी करून भारतीय संघात आपले स्थान निश्चित करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. परंतु या दौऱ्यावर तो साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला, तर त्याला भारतीय संघातून कायमचे स्थान गमवावे लागू शकते. (Kuldeep Yadav statement before India vs srilanka series)
भारतीय संघात स्थान मिळवण्याबाबत कुलदीप यादव म्हणाला
कुलदीप यादवने भारतीय संघात स्थान मिळवण्याबाबत बोलताना म्हटले होते की, “श्रीलंका दौरा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. कारण मला इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत संधी मिळाली नाही. माझ्याकडे ही स्वतःला सिद्ध करण्याची आणि चांगली कामगिरी करण्याची एक उत्तम संधी आहे. ही मालिका झाल्यानंतर आम्हाला आयपीएल स्पर्धा खेळायची आहे. तिथेही मला चांगलीच कामगिरी करायची आहे.”
तसेच कुलदीप यादवने स्पष्ट केले आहे की तो आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेचा विचार करत नाही. त्याचा उद्देश फक्त मिळालेल्या संधीचे सोने करणे इतकेच आहे. तसेच तो पुढे म्हणाला, “मला माहित आहे की, मी चांगली कामगिरी केली तर मला भारतीय संघात स्थान मिळेल. मी टी-२० विश्वचषक स्पर्धेबाबत जास्त विचार करत नाही. संघात स्थान मिळवण्यासाठी खूप स्पर्धा आहे. मला माझे कार्य माहीत आहे.”
असे असेल भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक
वनडे मालिका
१) पहिला वनडे सामना – १३ जुलै
२) दुसरा वनडे सामना – १६ जुलै
३) तिसरा वनडे सामना – १८ जुलै
टी-२० मालिका
१) पहिला टी – २०सामना – २१ जुलै
२) दुसरा टी-२० सामना – २२ जुलै
३) तिसरा टी -२० सामना – २५ जुलै
महत्वाच्या बातम्या-
मिताली राजची एकाकी झुंज पुन्हा अपयशी; इंग्लंड महिलांनी दुसऱ्या वनडेतील विजयासह मालिकाही टाकली खिशात