शनिवारी (14 ऑक्टोबर) विश्वचषक 2023 स्पर्धेतील 12वा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान संघात खेळला गेला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा 7 विकेट्सने दारुण पराभव केला. भारतीय संघाचा हा पाकिस्तानवर विश्वचषकात सलग आठवा विजय ठरला. भारताच्या या विजयात फिरकीपटू कुलदीप यादव याचे महत्त्वाचे योगदान राहिले. त्याने एकाच षटकात दोन महत्त्वपूर्ण बळी मिळवत भारतीय संघाला सामन्यात जोरदार पुनरागमन करून दिले होते. आपल्या या यशाचे श्रेय आता त्याने कर्णधार रोहित शर्मा याला दिले आहे.
पाकिस्तान संघासाठी या सामन्यात मोहम्मद रिझवान व बाबर आझम यांनी चांगली भागीदारी केली होती. सिराजने बाबरला बाद करून भारताला तिसरे यश मिळवून दिलेले. त्यानंतर कुलदीप ने गोलंदाजीला येत एकाच षटकात सौद शकील व इफ्तिखार अहमद यांना बाद करून पाकिस्तानच्या डावाला सुरूंग लावला. त्या वेळेच्या योजनेबाबत बोलताना कुलदीप म्हणाला,
“त्यावेळी माझा स्पेशल सुरू असताना रोहित माझ्याकडे आला आणि म्हणाला अजून एक षटक गोलंदाजी कर. मी ते अधिकचे षटक टाकले आणि आम्हाला दोन बळी मिळाले.”
या सामन्याचा विचार केल्यास भारताने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. भारताच्या सर्वच गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत पाकिस्तानचा डाव 191 धावांवर गुंडाळला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा व श्रेयस अय्यर यांनी अर्धशतके करत भारतीय संघाला सात गडी राखून मोठा विजय मिळवून दिला. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
(Kuldeep Yadav Talk About Rohit Sharma Plan Against Pakistan)
हेही वाचा-
श्रीलंकेच्या सलामीवारांचा भन्नाट विक्रम! ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली विश्वचषकातील सर्वात मोठी भागीदारी, वाचाच
पहिल्याच ओव्हरमध्ये स्टार्कची लंकन फलंदाजाला ताकीद, चेंडू टाकण्यापूर्वीच निघालेला क्रीझच्या बाहेर; पाहा व्हिडिओ