भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदावरुन सध्या सातत्यानं चर्चा सुरु आहे. अलीकडेच ऑस्ट्रेलियाचे रिकी पाँटिंग आणि जस्टिन लँगर यांनी टीम इंडियाच्या हेड कोचची ऑफर नाकारली होती. आता श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू कुमार संगकारा याचं एक वक्तव्य समोर आलं आहे.
कुमार संगकारा सध्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा हेड कोच आहेत. दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं राजस्थानचा पराभव केला. या सामन्यानंतर पत्रकार परिषेदेत बोलताना संगकारा याला भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला. पाँटिंग आणि लँगर यांनी नकार दिल्यानंतर कुमार संगकाराशी संपर्क साधण्यात आल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. यावर आता स्वत: संगकारा यानं स्पष्टीकरण दिलं आहे.
कुमार संगकारा यानं सांगितलं की, त्याला बीसीसीआयनं संपर्क साधलेला नाही. तसेच त्याच्याकडेही भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी पुरेसा वेळ नाही. संगकारा म्हणाला की, तो राजस्थान रॉयल्ससोबतच्या त्याच्या कामावर खूश आहे. तो सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यानंतर बोलत होता.
यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंग आणि जस्टिन लँगर यांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाची ऑफर नाकारली होती. रिकी पाँटिंगनं कौटुंबिक कारणं सांगितली, तर जस्टिन लँगरनं सांगितलं की, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांना प्रचंड दबावात काम करावं लागेल, ज्यासाठी ते तयार नाही.
रिकी पाँटिंग आणि जस्टिन लँगर यांच्या वक्तव्यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सारवासारव केली. “भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी कोणत्याही माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूशी संपर्क साधण्यात आलेला नाही. या पदासाठी भारतीय दावेदारांना प्राधान्य दिलं जाईल”, असं शाह म्हणाले होते.
आगामी टी 20 विश्वचषकानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळ संपणार आहे. यामुळे बीसीसीआय नवीन मुख्य प्रशिक्षकाच्या शोधात आहे. या पदासाठी आतापर्यंत अनेक नावं पुढे आली आहेत, मात्र अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
पराभवानंतर आता लाखो रुपयांचा दंड! राजस्थानच्या ‘या’ खेळाडूवर बीसीसीआयनं केली कारवाई
हार्दिक पांड्याच्या संपत्तीचा 70 टक्के हिस्सा घेणार नताशा? मुंबईच्या कर्णधाराची एकूण संपत्ती किती?