विश्वचषक 2023 स्पर्धेत आपल्या विस्फोटक फलंदाजीने विक्रमांचे मनोरे रचणारे अनेक खेळाडू आहेत. या खेळाडूंच्या यादीत आता श्रीलंकेच्या एका धुरंधराचाही समावेश झाला आहे. या पठ्ठ्याने विश्वचषक 2023 स्पर्धेत कुणालाही न जमलेली कामगिरी करून दाखवली आहे. ही कामगिरी गुरुवारी (दि. 09 नोव्हेंबर) बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळल्या जात असलेल्या न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघातील 41व्या सामन्यात केली गेली.
विश्वचषक 2023 स्पर्धेतील वेगवान अर्धशतक
विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेतील 41व्या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी श्रीलंकेकडून सलामीला फलंदाजीला उतरलेला फलंदाज कुसल परेरा (Kusal Perera) याने खास पराक्रम घडवला. त्याने यादरम्यान तुफान फटकेबाजी करत अवघ्या 22 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याने लॉकी फर्ग्युसन टाकत असलेल्या डावातील 8व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर चौकार मारत अर्धशतक पूर्ण केले. परेराने हे अर्धशतक करताच, तो विश्वचषक 2023 स्पर्धेत वेगवान अर्धशतक (World Cup 2023 Fastest Half Century) करणारा अव्वल क्रमांकाचा फलंदाज बनला. त्याने दोन फलंदाजांचा विक्रम मोडला.
https://twitter.com/CricCrazyJohns/status/1722541355451523361
त्याच्यापूर्वी हा विक्रम संयुक्तरीत्या कुसल मेंडिस आणि ट्रेविस हेड यांच्या नावावर होता. मेंडिसने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, तर हेडने न्यूझीलंडविरुद्ध 25 चेंडूत वेगवान अर्धशतक केले होते.
विश्वचषक 2023 स्पर्धेतील वेगवान अर्धशतक
22 – कुसल परेरा, विरुद्ध न्यूझीलंड*
25 – कुसल मेंडिस, विरुद्ध- दक्षिण आफ्रिका
25 – ट्रेविस हेड, विरुद्ध- न्यूझीलंड
https://twitter.com/SeerviBharath/status/1722544060702052738
याव्यतिरिक्त विश्वचषकाच्या इतिहासात वेगवान अर्धशतक करणाऱ्या श्रीलंकन खेळाडूंची यादी पाहिली, तर त्यात अव्वलस्थानी अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूज याचा समावेश आहे. त्याने 2015मध्ये होबार्ट येथे स्कॉटलंडविरुद्ध खेळताना 20 चेंडूत अर्धशतक केले होते. या यादीत परेरा दिनेश चंडीमल याच्यासह संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी आला आहे. चंडीमलने 2015मध्येच सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध 22 चेंडूत वेगवान अर्धशतक केले होते. तसेच, तिसऱ्या स्थानी कुसल मेंडिस असून त्याने विश्वचषक 2023मध्येच दिल्ली येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 25 चेंडूत वेगवान अर्धशतक केले होते.
विश्वचषकात सर्वात वेगवान अर्धशतक करणारे श्रीलंकन फलंदाज (चेंडूनुसार)
20 – अँजेलो मॅथ्यूज, विरुद्ध- स्कॉटलंड, होबार्ट, 2015
22 – कुसल परेरा, विरुद्ध- न्यूझीलंड, बंगळुरू, 2023*
22 – दिनेश चंडीमल, विरुद्ध-ऑस्ट्रेलिया, सिडनी, 2015
25 – कुसल मेंडिस, विरुद्ध- दक्षिण आफ्रिका, दिल्ली, 2023
तसेच, विश्वचषकाच्या इतिहासात वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम न्यूझीलंडचा माजी कर्णधार फलंदाज ब्रेंडन मॅक्युलम याच्या नावावर आहे. त्याने 2015च्या विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध अवघ्या 18 चेंडूत वेगवान अर्धशतक केले होते. (Kusal Perera smashed the fastest fifty in World Cup 2023 it came from just 22 balls)
हेही वाचा-
पहिल्या 5 ओव्हरमध्येच श्रीलंकेला धक्क्यावर धक्के! बोल्टने एकाच ओव्हरमध्ये घेतले 2 बळी
बंगळुरूत विलियम्सन ‘टॉस का बॉस’, ताफ्यात घातक वेगवान गोलंदाजाची एन्ट्री, लंकेतही एक बदल; पाहा संघ