इंडियन प्रीमियर लीग 2020 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा प्रवास खूपच चढ-उतारांचा होता. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज केएल राहुलच्या नेतृत्वाखालील या संघाला प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयश आले. त्यामुळे स्पर्धेतील अपयशानंतर पंजाबचे सह- मालक नेस वाडिया यांनी नवीन योजना आखण्याचा निर्णय घेतला आहे.
चेन्नईविरुद्धच्या पराभवामुळे पंजाब स्पर्धेतून पडला बाहेर
पंजाबने आयपीएल 2020 मध्ये झालेल्या पहिल्या सात सामन्यांमधून सहा गमावले आणि त्यानंतर सलग पाच जिंकून हा संघ प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहिला.प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी या संघाला चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध झालेल्या अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवणे आवश्यक होते. मात्र, चेन्नईविरुद्धच्या या महत्वपूर्ण सामन्यात पंजाबचा पराभव झाला आणि हा संघ स्पर्धेतून बाहेर पडला.
पंचाच्या चुकीच्या निर्णयाचा बसला फटका
नुकत्याच संपन्न झालेल्या आयपीएल स्पर्धेबद्दल बोलताना नेस वाडिया म्हणाले की, “पंचाने शॉर्ट धाव देण्याचा निर्णय घेतला होता. पंचाच्या या चुकीच्या निर्णयामुळे संघ प्ले ऑफमध्ये स्थान मिळवू शकला नाही. कर्णधार व प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली संघाने अपेक्षेनुसार सातत्य राखले नाही. संघाचा कर्णधार नवीन आहे. या नवीन संघात अनेक युवा खेळाडू आहेत. काही सामन्यात ते प्रभावी ठरले, तर काही सामन्यात ते काही खास कामगिरी करू शकले नाहीत. लिलाव लवकरच होणार आहे. यामध्ये आम्हाला मधल्या फळीतील उणिवा भरून काढायच्या आहेत. तसेच मजबूत गोलंदाजी विभागही मजबूत करायचा आहे.”
आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी केली नाही अपेक्षेनुसार कामगिरी
नेस वाडिया पंजाबचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आणि वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेल यांचा उल्लेख करत म्हणाले की, “ आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी अपेक्षेनुसार कामगिरी केली नाही. या दोन्ही खेळाडूंना गतवर्षीच्या लिलावात संघाने बरीच रक्कम देऊन विकत घेतले होते.”
ख्रिस गेल पुढल्या हंगामात सुरुवातीपासूनच खेळणार सामने
“ख्रिस गेलने या हंगामात चांगली कामगिरी केली. या हंगामात सुरुवातीच्या काही सामन्यात त्याची निवड झाली नव्हती. मात्र तो पुढच्या हंगामात निश्चितच पहिल्या सामन्यापासून प्लेयिंग इलेव्हनचा भाग असेल.”असेही पुढे बोलताना वाडिया म्हणाले
अनिल कुंबळेबरोबर केले तीन वर्षांचे नियोजन
वाडिया म्हणाले की, यापूर्वी वारंवार कर्णधार आणि प्रशिक्षक बदलण्याचा फटका फ्रेंचायझीला सहन करावा लागला होता, म्हणूनच आता त्यांनी अनिल कुंबळे आणि केएल राहुल यांच्यासमवेत तीन वर्षाच्या योजनेवर काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
पंजाबचे प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार केएल राहुल यांच्याबद्दल बोलताना वाडिया म्हणाले की “आम्ही अनिलबरोबर तीन वर्षांचे नियोजन केले आहे. केएल राहुल तीन वर्षांपासून आमच्याबरोबर आहे, म्हणून आम्हाला त्याला संघात कायम ठेवायचे होते आणि त्याने चांगली कामगिरी करून हा निर्णय बरोबर असल्याचे सिद्ध केले.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी: आयसीसीने महिला टी२० विश्वचषक २०२२ केला स्थगित, आता ‘या’ वर्षी होणार स्पर्धा
‘आर्थिक फायद्यासाठी भारताला मिळतील सोप्या खेळपट्ट्या’, माजी पाकिस्तानी खेळाडूचे वादग्रस्त वक्तव्य
स्टार क्रिकेटर प्रिया पुनियाला चाहत्याने विचारला बॉयफ्रेंडबद्दल प्रश्न; दिले अजब रिऍक्शन