आयपीएलच्या 13 व्या हंगामात किंग्स इलेव्हन पंजाब संघाने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने पंजाबला सुपर ओव्हर मध्ये पराभूत केले होते. मात्र दुसऱ्या सामन्यात पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला पराभूत करून या हंगामातील पहिला विजय मिळविला.
पंजाबचा युवा फिरकीपटू रवी बिष्णोई उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे. त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. त्याने फेकलेली गुगली खेळणे फार अवघड आहे. आता या युवा फिरकीपटूने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू स्टिव्ह स्मिथला एकप्रकारे इशारा दिला आहे.
आयपीएलच्या अधिकृत वेबसाईवर एक व्हिडिओ शेअर केला गेला आहे. या व्हिडिओमध्ये पंजाबचा सलामीवीर मयंक अगरवालने सहकारी खेळाडू रवी बिष्णोई याला विचारले की, या आयपीएलमध्ये तुला कोणत्या फलंदाजाला बाद करणे आवडेल? त्याला उत्तर देताना युवा फिरकीपटू म्हणाला, “स्टिव्ह स्मिथ, कारण तो फिरकीविरुध्द चांगली फलंदाजी करतो आणि सध्या तो कसोटी क्रिकेटमधील प्रथम क्रमांकाचा फलंदाज आहे.”
27 सप्टेंबर रोजी बिष्णोईचे हे लक्ष्य पूर्ण होऊ शकते. कारण या दिवशी पंजाबचा तिसरा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. त्याने 2 सामन्यात 4 बळी घेतले आहेत. स्मिथला बाद करणे त्याला अवघड जाईल कारण स्मिथ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. राजस्थानच्या पहिल्याच सामन्यात त्याने 69 धावांची शानदार खेळी खेळली होती.
राजस्थानच्या जोधपूरमध्ये जन्मलेला रवी बिश्नोई 5 सप्टेंबर 2020 रोजी 20 वर्षांचा झाला. 19 वर्षाखालील विश्वचषकात त्याने शानदार गोलंदाजी केली होती. आयपीएलमध्ये संधी मिळाल्यावर तो म्हणाला, “मला चांगले वाटत आहे कारण माझ्यासारख्या युवा खेळाडूसाठी हे एक मोठे व्यासपीठ आहे. आयपीएलमध्ये खेळणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते.”