साऊथॅम्पटन। बुधवारी (२३ जून) न्यूझीलंड क्रिकेट संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला ८ विकेट्सने पराभूत करत विजेतेपदाला गवसणी घातली. न्यूझीलंडच्या या विजयामुळे १४४ वर्षांच्या कसोटी क्रिकेटला आपला पहिला विश्वविजेता संघ मिळाला. न्यूझीलंडच्या या विजयात अष्टपैलू क्रिकेटपटू काईल जेमिसनने मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे त्याला अंतिम सामन्यातील ‘सामनावीर’ पुरस्कारानेही गौरविण्यात आले.
जेमिसनची अंतिम सामन्यात अफलातून कामगिरी
जेमिसन न्यूझीलंडसाठी अंतिम सामन्यात सर्वात महत्त्वाचा खेळाडू ठरला. त्याने भारताच्या पहिल्या डावात गोलंदाजी करताना २२ षटकांत ३१ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. त्याच्या विकेट्समध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, रिषभ पंत अशा धोकादायक फलंदाजांचा समावेश होता.
इतकेच नाही तर फलंदाजीतही त्याने छोटेखानी पण महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने न्यूझीलंडकडून पहिल्या डावात ८ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना १६ चेंडूत १ षटकारासह २१ धावा केल्या.
त्यानंतरही त्याने आपले सर्वात महत्त्वाचे योगदान दिले. बुधवारी या सामन्याच्या अखेरच्या आणि निर्णायक दिवशी त्याने गोलंदाजीत कमाल करताना विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा या भारताच्या प्रमुख फलंदाजांच्या विकेट्स घेतल्या. त्याच्या याच अष्टपैलू कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
For his match figures of 7/61, Kyle Jamieson is adjudged the Player of the Match ????#WTC21 Final | #INDvNZ | https://t.co/8pVVHdl8nE pic.twitter.com/WbVspLrSS0
— ICC (@ICC) June 23, 2021
कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गाजवली
आयसीसीने कसोटी अजिंक्यपद स्पर्धा चालू केल्यानंतर याच स्पर्धेचा भाग असलेल्या न्यूझीलंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेतून जेमिसनने २०२० साली कसोटी पदार्पण केले. पदार्पणाच्या मालिकेतच त्याने आपल्यातील प्रतिभेची चुणूक दाखवली. त्याने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत २ सामन्यांत ९३ धावा आणि ९ विकेट्स घेत पदार्पण गाजवले.
त्यानंतरही त्याने न्यूझीलंडसाठी चांगली कामगिरी करणे सुरुच ठेवले. या कालावधीत तो न्यूझीलंडच्या कसोटी संघातील नियमित खेळाडू बनला. तब्बल ६ फुट ८ इंच इतकी उंची लाभलेल्या जेमिसनने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ७ सामन्यांत खेळताना १२.५३ च्या सरासरीने ४३ विकेट्स घेतल्या.
यादरम्यान त्याने ५ वेळा एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली. तसेच एकवेळा त्याने सामन्यात १० विकेट्स घेण्याचा कारनामा केला. विशेष म्हणजे या स्पर्धेत सर्वाधिकवेळा एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा विक्रमही त्याच्या नावावर झाला.
एवढेच नाही तर या संपूर्ण स्पर्धेत त्याने न्यूझीलंडकडून तळातल्या फळीत फलंदाजी करताना ४९.४० च्या सरासरीने २४७ धावा केल्या. यात त्याच्या एका अर्धशतकाचाही समावेश आहे. जेमिसनची ही कामगिरी पाहाता हेच सिद्ध होते, की यास्पर्धेत तो न्यूझीलंडसाठी सर्वात महत्त्वाचा खेळाडू ठरला.
महत्त्वाच्या बातम्या –
स्मिथची सावली मानल्या जाणाऱ्या लॅब्युशेनने गाजवली अख्खी ‘टेस्ट चॅम्पियनशिप’
जून महिना, इंग्लंडचे मैदान, भारतीय संघ अन् आयसीसी स्पर्धेचा अंतिम सामना-एक अनोखा योगायोग






