जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना १९ जूनपासून इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर खेळवला जात आहे. भारत आणि न्यूझीलंडचे संघ या सामन्यात आमनेसामने आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. मात्र गोलंदाजांना अनुकूल असलेल्या वातावरणात भारतीय फलंदाजी फार काळ तग धरू शकली नाही.
पहिल्या दिवसअखेर भारत ३ बाद १४६ अशा सुस्थितीत होता. मात्र दुसर्या दिवशी किवी गोलंदाजांनी पुनरागमन करत भारतीय संघाला अवघ्या २१६ धावांवर सर्वबाद केले. यात सगळ्यात मोठा वाटा होता, तो वेगवान गोलंदाज कायले जेमिसनचा. त्याने तब्बल पाच बळी घेत भारताची फलंदाजी फळी कापून काढली.
जेमिसनच्या नावे झाला ‘हा’ विक्रम
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पहिल्या दिवशी ६५ षटकांचाच खेळ होऊ शकला होता. त्यावेळी भारताच्या फलंदाजांनी धीरोदात्त फलंदाजी करतांना ३ बाद १४६ धावा केल्या होत्या. त्यामुळे दुसर्या दिवसाची सुरुवात झाली तेव्हाही भारतीय संघ सामन्यात पुढे असल्याचे चित्र होते. परंतु, न्यूझीलंडचा उंचपुरा वेगवान गोलंदाज कायले जेमिसनने हे चित्र काही वेळातच पालटले.
पहिल्या दिवशी एक विकेट घेणार्या जेमिसनने दुसर्या दिवशी मात्र चार विकेट पटकावल्या. यात भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या महत्वपूर्ण विकेटचा देखील समावेश होता. जेमिसनने भारताचा दहाव्या क्रमांकावरील फलंदाज जसप्रीत बुमराहला बाद करत डावातील पाचवा बळी मिळवला. यासह त्याने बळींचे पंचक देखील पूर्ण केले. विशेष म्हणजे त्याचा हा केवळ आठवा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना आहे. मात्र या कालावधीत त्याने मिळवलेले हे पाचवे बळींचे पंचक ठरले. अवघ्या आठ कसोटी सामन्यात पाचव्यांदा बळींचे पंचक पूर्ण करणारा जेमिसन न्यूझीलंडचा पहिलाच गोलंदाज ठरला आहे.
In just 8 Test matches thus far, Kyle Jamieson has bagged 5 five-wicket hauls, which is the most during the World Test Championship!
An average of 14.05 and a strike rate of 35.91 is just world-class!#KyleJamieson #WTCFinal21 #INDvNZ #Pant #Jadeja #Jaddu pic.twitter.com/tBEAUeH6rl— OneCricket (@OneCricketApp) June 20, 2021
भारताची दुसर्या दिवशी घसरगुंडी
दरम्यान, दुसर्या दिवशी ३ बाद १४६ अशा सुस्थितीत सुरुवात करणार्या भारताची त्यानंतर घसरगुंडी उडाली. पहिल्या दिवसाच्या धावसंख्येत अवघ्या ७१ धावांची भर टाकून भारताचा डाव आटोपला. आता पहिल्या डावात केवळ २१७ धावा उभारल्याने सामन्यात पुनरागमन करण्यासाठी भारतीय गोलंदाजांना चमकदार कामगिरी करावी लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: