चेन्नई। गुरुवारी (१८ फेब्रुवारी) पार पडलेल्या इंडियन् प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगांमाच्या लिलावात अनेक धक्कादायक निर्णय पाहायला मिळाले. अनेक संघांनी कोट्यावधींच्या बोली लावत काही स्टार खेळाडू आपल्या संघात दाखल करुन घेतले. यात न्यूझीलंडचा स्टार गोलंदाज काईल जेमिसनला १५ कोटींपेक्षाही अधिक रकमेची बोली लागली आहे.
तब्बल ६ फुट ८ इंच उंची असणाऱ्या जेमिसनसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि किंग्स इलेव्हन पंजाब संघात या दोन संघात खुप वेळ चुरस सुरु होती. दोघांनाही जेमिसन हवा होता. पण अखेर बेंगलोरने १५ कोटींची बोली लावत जेमिसनला संघात सामील करुन घेतले. त्यामुळे जेमिसन बेंगलोरकडून आयपीएलमध्ये पदार्पण करेल.
न्यूझीलंडचा सर्वात उंच गोलंदाज –
जेमिसन क्रिकेटमधील सर्वाधिक उंची असणाऱ्या गोलंदाजांपैकी एक आहे. त्याची ६ फूट ८ इंच एवढी उंची आहे. तसेच तो न्यूझीलंडचा सर्वात उंच क्रिकेटपटू आहे. त्याला त्याच्या उंचीमुळे उसळणाऱ्या खेळपट्टीवर गोलंगाजी करताना स्विंगबरोबरच अतिरिक्त उसळीही मिळते.
कसोटी पदार्पणात मिळवली होती विराटची विकेट –
जेमिसनने कसोटी पदार्पण भारताविरुद्ध केले होते. यावेळी त्याने भारताचा कर्णधार विराट कोहलीची २ धावांवर विकेट घेतली होती. आता यंदा आयपीएलमध्ये जेमिसन विराटच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये खेळणार आहे.
जेमिसनची टी२० कारकिर्द –
जेमिसनने त्याच्या कारकिर्दीत ४ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले असून यात त्याने ३ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने ३८ ट्वेंटी-ट्वेंटी सामने खेळले असून ५४ विकेट्स घेतल्या आहेत.






