प्रतिष्ठेच्या ‘ऑल इंग्लंड ओपन’ बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. भारताचा स्टार खेळाडू लक्ष्य सेन पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत पराभूत झाला. अशा प्रकारे लक्ष्य सेनचं ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न भंग पावलं.
भारताच्या या अनुभवी खेळाडूला इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीनं पराभूत केलं. तीन सेटपर्यंत चाललेल्या या सामन्यात जोनाथन क्रिस्टीनं लक्ष्य सेनचा 21-12, 10-21, 21-15 असा पराभव केला. या विजयानंतर जोनाथन क्रिस्टीनं स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.
उपांत्य फेरीबद्दल बोलायचं झालं तर, लक्ष्य सेनला जोनाथन क्रिस्टीविरुद्ध पहिल्या सेटमध्ये 21-10 असा पराभव पत्कारावा लागला. मात्र दुसऱ्या सेटमध्ये त्यानं शानदार पुनरागमन केलं. या सेटमध्ये लक्ष्य सेननं इंडोनेशियन खेळाडूचा 21-10 असा पराभव केला. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये जोनाथन क्रिस्टीनं लक्ष्य सेनचा 21-14 असा पराभव करत सामना खिशात घातला.
22 वर्षीय लक्ष्य सेननं उपांत्यपूर्व फेरीत मलेशियाचा माजी चॅम्पियन ली जी जिओचा पराभव केला होता. लक्ष्य सेननं पहिल्या गेममध्ये पिछाडीवर पडल्यानंतर जोरदार पुनरागमन केलं. हा सामना सुमारे 71 मिनिटं चालला होता. यापूर्वी लक्ष्य सेननं 2022 ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. परंतु विजेतेपदाच्या लढतीत व्हिक्टर ऍक्सेलसेननं त्याचा 21-10, 21-15 असा सरळ सेटमध्ये पराभव केला होता.
‘ऑल इंग्लंड ओपन’ ही बॅडमिंटन मधील सर्वात प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते. आतापर्यंत केवळ दोन भारतीयांना ही स्पर्धा जिंकता आली आहे. दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी 1980 मध्ये पहिल्यांदा विजेतेपद पटकावलं होतं. तर 23 वर्षांपूर्वी 2001 मध्ये पुलेला गोपीचंद यांनी ही स्पर्धा जिंकली होती. मात्र त्यानंतर एकाही भारतीयाला ही स्पर्धा जिंकता आलेली नाही. पीव्ही सिंधूनं 2015 साली आणि लक्ष्य सेननं 2022 साली स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. मात्र दोघांनाही विजेतेपद मिळवण्यात अपयश आलं.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताच्या ‘या’ स्टार खेळाडूला महिला वसतिगृहात जाताना पकडलं, ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंग
आयपीएलचं समालोचन पॅनेल जाहीर; सुनील गावसकर, रवी शास्त्रींसह अनेक दिग्गज घेणार हातात माईक