कसोटी क्रिकेटला 145 वर्षांचा इतिहास आहे. या कालावधीत भारतीय संघाने देखील कसोटी क्रिकेटमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. अनेक असे दिग्गज खेळाडू होऊन गेले ज्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये अनेक मोठमोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. कसोटी क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर भारतीय संघाकडून 85 पेक्षा अधिक फलंदाज आहेत, ज्यांनी मिळून 525 पेक्षा अधिक शतके झळकावली आहेत. ज्यामध्ये सचिन तेंडुलकर याने सर्वाधिक 51 कसोटी शतक झळकावले आहेत. परंतु भारतीय संघाकडून पहिले शतक कोणी झळकावले होते? हे अनेकांना माहीत नसेल. आपल्या पदार्पणाच्या सामन्यात लाला अमरनाथ यांनी शतक झळकावण्याचा पराक्रम केला होता. लाला अमरनाथ यांची 05 ऑगस्ट रोजी 23वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने आपण त्यांचा खास पराक्रम जाणून घेऊयात…
भारतीय संघाचे दिग्गज फलंदाज लाला अमरनाथ (Lala Amarnath) यांनी 17 डिसेंबर 1933 रोजी भारतीय संघासाठी पहिले शतक झळकावले होते. त्यांना वयाच्या 22 व्या वर्षी पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. बॉम्बे जिमखानाच्या मैदानावर इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्यांनी 118 धावांची तुफानी खेळी केली होती. परंतु या सामन्यात भारतीय संघाला 9 गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता.
भारतीय संघाने दुसऱ्या डावात 2 गडी बाद अवघ्या 21 धावा केल्या होत्या. त्यानंतर लाला अमरनाथ नावाचं वादळ आलं आणि त्यांनी 117 मिनिट फलंदाजी करत 118 धावांची तुफानी खेळी केली. या खेळी दरम्यान त्यांनी 21 चौकार मारले होते. यासह कर्णधार सीके नायडू यांच्यासोबत मिळून 186 धावांची भागीदारी केली होती. जी या सामन्यातील सर्वात मोठी भागीदारी ठरलेली.
आपल्या कारकीर्दीच्या पहिल्या सामन्यात झळकावलेले हे शतक त्यांच्या कारकिर्दीतील एकमात्र शतक ठरले. त्यांनी आपल्या कारकीर्दीत एकूण 24 कसोटी सामने खेळले. ज्यामध्ये त्यांनी एकूण 878 धावा केल्या. यासह 45 गडी देखील बाद केले होते.
त्यानंतर त्यांची मुलं सुरींदर अमरनाथ आणि मोहिंदर अमरनाथ यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी मिळून एकूण 13 शतक झळकावले. ज्यामध्ये लाला अमरनाथ आणि सुरिंदर अमरनाथ यांनी प्रत्येकी 1-1 शतक झळकावले. तर मोहिंदर अमरनाथ यांनी 11 शतके झळकावली.
लाला अमरनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील पहिल्या अधिकृत मालिकेत विजय मिळवला होता. ही मालिका 1952-53 मध्ये झाली होती. त्यांनी आपल्या 19 वर्षाच्या कारकिर्दीत भारतीय संघाला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले. त्यानंतर 5 ऑगस्ट, 2000 साली त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
महत्त्वाच्या बातम्या-
स्वतंत्र भारताचे पहिले कर्णधार लाला अमरनाथ यांच्याबद्दल माहित नसलेल्या 10 गोष्टी
इंग्लंडच्या लीगमध्ये खणकलं स्मृतीचं नाणं! सलग 2 अर्धशतक ठोकत बनली ‘असा’ विक्रम करणारी पहिलीच महिला