---Advertisement---

दोन नव्या संघांच्या निवडीनंतर बीसीसीआयवर बरसले ललित मोदी; म्हणाले…

On: बुधवार, ऑक्टोबर 27, 2021 9:27 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढील हंगामात दोन नवीन संघ मैदानात उतरलेले दिसतील. सोमवारी (२५ ऑक्टोबर) झालेल्या या दोन नवीन संघांच्या लिलावात आरपीएसजी व सीव्हीसी कॅपिटल या दोन कंपन्यांनी अनुक्रमे लखनौ आणि अहमदाबाद या शहरांची फ्रॅंचाईजी जिंकत पुढील हंगामासाठी तयारी सुरू केली. या दोन्ही कंपन्यांनी हजारो करोड रुपये खर्च करत ही बोली जिंकली. मात्र, आयपीएलची सुरुवात करणारे आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी या प्रक्रियेवर टीका केली आहे.

करोडो रुपयांची लागली बोली
आयपीएल आणखी मोठी करण्यासाठी बीसीसीआयने दोन नव्या संघांच्या निविदा मागवल्या होत्या. यामध्ये अहमदाबाद व लखनौ या दोन शहरांसाठी बोली लावली गेली. प्रसिद्ध उद्योगपती संजीव गोयंका यांच्या मालकीच्या आरपीएसजी ग्रुपने लखनौ फ्रॅंचाईजीसाठी ७००० कोटींपेक्षा अधिक तर, ला लीगा या स्पॅनिश फुटबॉल स्पर्धेमध्ये भागीदारी असलेल्या सीव्हीसी कॅपिटल्सने ५६०० कोटी रुपयांची बोली लावत अहमदाबाद फ्रॅंचाईजी आपल्या नावावर केली.

ललित मोदी यांची टिका
सीव्हीसी कॅपिटल्सने ही फ्रॅंचायजी विकत घेतल्यानंतर आयपीएलचे जनक म्हणून ओळखले जाणारे व आयपीएलमध्ये भ्रष्टाचार केल्यामुळे सध्या लंडन येथे राहत असलेले ललित मोदी यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना ट्विट केले. त्यांनी लिहिले,
‘सट्टेबाजी करण्यास प्राधान्य देणारी कंपनी आयपीएलमध्ये संघ विकत घेऊ शकते, असा नवा नियम बीसीसीआयने काढला आहे वाटते. बीसीसीआयने काही अभ्यास केला नव्हता का? या प्रकरणात भ्रष्टाचार विरोधी पथक काही करणार का?’
सीव्हीसी कॅपिटल्सची युरोपमधील काही सट्टेबाजी कंपन्यांमध्ये देखील गुंतवणूक आहे. याच कारणाने मोदी यांनी या प्रकरणावर शरसंधान साधले.

तर होऊ शकते अदानींची एन्ट्री
सीव्हीसी कॅपिटल्सने बोली जिंकल्यानंतर अनेक टीका होत होत्या. कदाचित ही बोली रद्द झाल्यास त्या स्थानावर अदानी समूह आपला दावा ठोकू शकते. कारण अहमदाबाद फ्रॅंचाईजीसाठी त्यांनीदेखील बोली लावलेली. मात्र, ५२५ कोटी रुपयांनी ते मागे पडले होते. याव्यतिरिक्त प्रसिद्ध फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडच्या मालकांनी देखील आयपीएलचा संघ खरेदी करण्यात रस दाखवलेला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---