इंडियन प्रीमियर लीगमध्ये दोन नव्या संघासाठी मोठ्या उत्साहात लिलाव पार पडला. पण या दोन नवीन आयपीएल संघांच्या मालकांबाबत वाद वाढत असल्याचे दिसत आहे. याप्रकरणी आता आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी बीसीसीआयवर निशाणा साधला आहे. त्यांनी बोर्डावर गंभीर आरोप केले आहेत आणि म्हटले आहे की, सट्टेबाजी करणाऱ्या कंपन्याही आयपीएल संघ खरेदी करू शकतात का?
भारतीय क्रिकेट मंडळाने ‘आरपीएसजी वेंचर्स लिमिटेड’ आणि ‘इरेलिया कंपनी पीटीई लिमिटेड’ यांची २०२२ पासून नवीन आयपीएल संघांचे मालक म्हणून नियुक्ती केली आहे. आरपीएसजी ग्रुपने ७०९० कोटी रुपये देऊन लखनऊ फ्रँचायझी जिंकली, तर सीवीसी कॅपिटल पार्टनर्स यांनीन अहमदाबाद फ्रँचायझी जिंकण्यासाठी दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक ५६०० कोटी रुपयांची बोली लावली.
याबद्दल आता ललित मोदी यांनी बीसीसीआयवर निशाणा साधत ट्विट केले. त्यांनी लिहिले की “मला वाटते की सट्टेबाजी कंपन्या आयपीएल संघ खरेदी करू शकतात. असा एखादा नवा नियम असावा. साहजिकच, एक मोठी बोली लावणारा देखील मोठ्या सट्टेबाजी कंपनीचा मालक आहे. आता पुढे काय? बीसीसीआय आपला गृहपाठ करत नाही का? अशा वेळी अँटी करप्शन काय करू शकते?”
i guess betting companies can buy a @ipl team. must be a new rule. apparently one qualified bidder also owns a big betting company. what next 😳😳😳 – does @BCCI not do there homework. what can Anti corruption do in such a case ? #cricket
— Lalit Kumar Modi (@LalitKModi) October 26, 2021
सीवीसी कॅपिटल चौकशी अंतर्गत
आउटलुकने आपल्या एका अहवालात दावा केला आहे की, “सीव्हीसी कॅपिटल सट्टेबाजी कंपन्यांशी असलेल्या आपल्या संबंधांमुळे चौकशीच्या फेऱ्यात सापडली आहे.” या अहवालानंतर, नवीन आयपीएल संघ अहमदाबाद फ्रँचायझीची बोली जिंकणारी सीव्हीसी कॅपिटल आता वादात सापडली आहे.
अहवालानुसार, बीसीसीआयचे लक्ष सीव्हीसी कॅपिटलच्या इतर व्यवहारांवर होते. परंतु सोमवारी( २५ ऑक्टोबर) आर्थिक व्यवहार सुरू होण्यापूर्वी ‘पडताळणी टप्प्यात’ याची दखल घेतली गेली नाही, हे आश्चर्यकारक होते. सीव्हीसी कॅपिटल पार्टनर्स हे सट्टेबाजी कंपन्यांसोबतच्या संबंधांमुळे अडचणीत आले आहेत.
अहवालानुसार, सीव्हीसी कॅपिटलने सट्टेबाजी आणि जुगार कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. सन २०१३ मध्ये मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजीमुळे आयपीएलची बरीच बदनामी झाली होती. याच कारणामुळे चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सवर दोन हंगामासाठी बंदी घालण्यात आली होती. अनेक माध्यम संस्थांनी या प्रकरणी बीसीसीआयशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र बोर्डाने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० क्रमवारीत मोठे फेरबदल; रिजवानने मिळवले चौथे स्थान, तर विराट-केएलला मोठे नुकसान
“द्रविडने प्रशिक्षकपदासाठी अर्ज केल्यानंतर दुसऱ्या कोणी अर्ज करण्याची गरज नाही”