युएई आणि ओमान येथे झालेल्या टी२० विश्वचषक २०२१ चे ऍरॉन फिंच याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया संघाने विजेतेपद मिळवले. त्यापूर्वी एकदाही टी२० विश्वचषक न जिंकलेला ऑस्ट्रेलिया संघ या विश्वचषकात विजेते बनण्याचा निर्धार करून आला होता, जो त्यांनी पूर्ण केला. ही स्पर्धा सुरू असतानाच आता ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू ऍण्ड्रू सायमंड्स याने ऑस्ट्रेलिया संघाविषयी मोठा खुलासा केला होता.
सायमंड्सचा महत्त्वपूर्ण खुलासा
एका मुलाखतीत बोलताना सायमंड्स म्हणाला होता, “सध्या सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात ऑस्ट्रेलिया संघाचा मेंटर बनण्याचा प्रस्ताव मला आला होता. संघाचा प्रशिक्षक व माझा मित्र जस्टीन लॅंगरने हा प्रस्ताव ठेवलेला. मात्र, कोविड नियमावली व बायो-बबल या सर्व प्रकारामूळे यासाठी नकार दिला.”
सायमंड्स पुढे म्हणाला, “जस्टिनने ज्यावेळी ही गोष्ट मला सांगितली त्यावेळी मी खूप आनंदित झालेलो. मी हा स्वतःचा गौरव समजत होतो. मात्र, कोरोना नियमावलीच्या कारणाने मी नकार दिला. ऑस्ट्रेलिया संघ व्यवस्थापन टी२० प्रकारात चांगली कामगिरी केलेल्या माजी खेळाडूला संघाचा भाग बनू इच्छित होते. त्यांना कोणीतरी नवा चेहरा हवा होता.”
सायमंड्स हा आपल्या काळातील दिग्गज फटकेबाज म्हणून प्रसिद्ध होता. त्याने आपल्या अष्टपैलू खेळाने ऑस्ट्रेलियाला अनेक सामन्यात एकहाती विजय मिळवून दिलेला. मात्र, स्वतःच्या वादामुळे त्याची कारकीर्द अवेळी संपुष्टात आली.
ऑस्ट्रेलिया करते प्रयोग
क्रिकेट ऑस्ट्रेलिया आपल्या राष्ट्रीय संघसह अनेक माजी खेळाडूंना विविध दौऱ्यांवर पाठवत असते. २०१९ वनडे विश्वचषकावेळी ऑस्ट्रेलियाला दोन विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार रिकी पॉंटिंग याला संघाचा मार्गदर्शक बनवले होते. २०१९ ऍशेस मालिकेवेळी माजी कर्णधार स्टीव्ह वॉ संघाचा मेंटर बनला होता. तसेच दिग्गज फलंदाज माईक हसी यानेदेखील काही काळ ही भूमिका पार पाडली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
तुफान गुणवत्ता असूनही केवळ वादांमुळे क्रिकेट करियर संपलेले ५ क्रिकेटपटू
दारु पिणे किती महागात पडू शकते, याची ५ क्रिकेटमधील उदाहरणे
टीम इंडियाबरोबर झालेल्या ‘त्या’ वादामुळे दारुडा झाल्याचे सायमंडने केले होते आरोप