कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू असलेल्या कसोटी सामन्यात भारत आणि बांगलादेशचे संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
हा सामना सुरू होण्यापूर्वी चाहते स्टेडियममध्ये येणाऱ्या माकडांमुळे खूप चिंतेत होते. याचं कारण म्हणजे या स्टेडियममध्ये माकडांची खूप दादागिरी पाहायला मिळते. मात्र आता उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशननं या माकडांचा उपद्रव रोखण्यासाठी ठोस व्यवस्था केली आहे.
या स्टेडियममध्ये अनेकदा माकडांचे विविध गट झुंडीनं प्रवेश करतात. ते त्यांची भूक भागवण्याच्या प्रयत्नात असतात. हे माकडं लोकांकडून अन्नपदार्थ चोरतात. त्यामुळे आता ग्रीन पार्क स्टेडियमवर माकडांकडून अन्न हिसकावण्याचा धोका दूर करण्यासाठी उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशननं चक्क लंगूर आणि त्यांच्या हँडलरची नियुक्ती केली आहे!
व्हेन्यू डायरेक्टर संजय कपूर यांच्या मते, स्टँडमध्ये ब्रॉडकास्ट कॅमेरे असलेल्यांना माकडांचा सर्वाधिक धोका असतो. माकडांची दहशत टाळण्यासाठी आणि त्यांना हुसकावून लावण्यासाठी आम्ही लंगूर भाड्यानं घेतल्याचं त्यांनी सांगितलं. यासोबतच ज्या ठिकाणाहून ब्रॉडकास्ट टीम मॅचची रेकॉर्डिंग करते, ती जागा मागून आणि दोन्ही बाजूंनी काळ्या कापडानं झाकण्यात आली आहे, जेणेकरून माकडं खाद्यपदार्थांपर्यंत पोहोचण्याची शक्यता कमी होईल.
दुसरीकडे, ग्रीन पार्क स्टेडियमचा सी स्टँड कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी प्रेक्षकांसाठी बंद करण्यात आला होता. उत्तर प्रदेश सार्वजनिक बांधकाम विभागानं हा स्टँड वापरण्यायोग्य नसल्याचं घोषित केलं आहे. स्टँडमधील काही जागा प्रेक्षकांना बसण्यासाठी योग्य नव्हत्या. मात्र वरच्या ब्लॉकमधील सुमारे 1750 जागा अजूनही प्रेक्षकांसाठी उपलब्ध आहेत.
दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग 11
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
बांगलादेश – नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, लिटन दास (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराज, शकीब अल हसन, हसन महमूद, तैजुल इस्लाम, खालिद अहमद
हेही वाचा –
यशस्वी जयस्वालचा खतरनाक झेल, फलंदाज-गोलंदाज कोणाचाच विश्वासच बसेना! VIDEO पाहाच
शिखर धवनची संथ फलंदाजी; संघाचा दारुण पराभव, माजी आरसीबी खेळाडूची शानदार खेळी
ग्राऊंड स्टाफही विराट कोहलीचे जबरे फॅन! मनाला स्पर्श करणारा व्हिडिओ व्हायरल