जागतिक क्रिकेटमध्ये ज्या सर्वोत्तम टी२० लीगची सर्वाधिक चर्चा होते, त्यामध्ये इंडियन प्रीमिअर लीगचा (आयपीएल) समावेश आहे. २००८साली पहिल्याच आयपीएल हंगामाचे विजेतेपद जिंकणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाने दुसऱ्या अंतिम सामन्यात धडक दिली. त्यांनी क्वालिफायर २ सामन्यात शुक्रवारी (दि. २७ मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला पराभूत केले. आता ते रविवारी (दि. २९ मे) गुजरात टायटन्स संघाविरुद्ध अंतिम सामना खेळतील. मात्र, या सामन्यापूर्वीच राजस्थान संघाचा सल्लागार लसिथ मलिंगा याने मोठी भविष्यवाणी केली.
राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाला आपल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवानंतर राजस्थानने दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात कायापालटच केला. त्यांनी आपल्या फलंदाजांच्या जोरावर बेंगलोरला पराभूत करत दमदार पुनरागमन केले.
सामन्याचा आढावा
क्वालिफायर २ सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजीला आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाने निर्धारित २० षटकात ८ विकेट्स गमावत १५७ धावा चोपल्या होत्या. या धावांचे आव्हान राजस्थानने १८.१ षटकात ३ विकेट्स गमावत पूर्ण केले. अशाप्रकारे राजस्थानने सामना ७ विकेट्सने खिशात घालत अंतिम सामन्यात धडक दिली.
लसिथ मलिंगाची भविष्यवाणी
आयपीएल २०२२मधील दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थानच्या विजयाची भविष्यवाणी आधीच करण्यात आली होती. ही भविष्यवाणी राजस्थान संघाचाच गोलंदाजी सल्लागार लसिथ मलिंगा (Lasith Malinga) याने केली होती. मलिंगाच्या भविष्यवाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.