शारजाह। बुधवारी (१३ ऑक्टोबर) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ च्या हंगामातील दुसऱ्या क्वालिफायरमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाने विजय मिळवला आणि अंतिम सामन्याचे तिकिट पक्के केले. कोलकाताने दिल्ली कॅपिटल्सला ३ विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. हा सामना अखेरच्या षटकापर्यंत रोमांचकारी ठरला.
सामन्याच्या सुरुवातीला कोलकाताकडे सामन्याचे पारडे झुकले होते. पण दिल्लीच्या गोलंदाजांनी अखेरच्या ४ षटकांमध्ये अप्रतिम गोलंदाजी करत संघाला सामन्यात पुनरागमन करुन दिलेले. पण अखेर, कोलकाताने अखेरचे २ चेंडू बाकी असताना बाजी मारली.
असा रंगला अखेरच्या ४ षटकांचा रोमांच
या सामन्यात दिल्लीने कोलकातासमोर १३६ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताला व्यंकटेश अय्यर (५५) आणि शुबमन गिलने (४६) ९६ धावांची सलामी देत चांगली सुरुवात दिली होती. तसेच १६ व्या षटकापर्यंत कोलकातने २ बाद १२३ धावा केल्या होत्या. त्यामुळे हा सामना कोलकाता सहज जिंकेल असे वाटत होते.
कोलकाताला अखेरच्या ४ षटकांत म्हणजेच २४ चेंडूत १३ धावांची गरज होती. मात्र, १७ व्या षटकात गिल अवेश खानच्या चेंडूवर यष्टीरक्षक रिषभ पंतकडे झेल देऊन बाद झाला. या षटकात अवेशने केवळ २ धावा दिल्या तर दिनेश कार्तिकला १८ व्या षटकात कागिसो रबाडाने त्रिफळाचीत केले. या षटकात कोलकाताला केवळ १ धाव करता आली.
इतकेच नाही तर, १९ व्या षटकात एन्रीच नॉर्किएने अप्रतिम गोलंदाजी करत केवळ ३ धावा दिल्या आणि अखेरच्या चेंडूवर कोलकाताचा कर्णधार ओएन मॉर्गनला एन्रीच नॉर्किएने त्रिफळाचीत केले. मॉर्गन बाद होण्याच्या आधी कोलकाताला ७ चेंडूत ७ धावा हव्या होत्या. पण मॉर्गनही बाद झाल्याने कोलकातासमोर अखेरच्या षटकात ७ धावा असे समीकरण उभे राहिले.
अखेरचे षटक आर अश्विनने टाकले. त्याने सुरुवातीला उत्तम गोलंदाजी केली. त्याने पहिल्या चेंडूवर १ धाव दिल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव टाकला. तर तिसऱ्या चेंडूवर शाकिब अल हसनला आणि चौथ्या चेंडूवर सुनील नारायणला माघारी धाडले. त्यामुळे पारडे दिल्लीच्या बाजूने झुकले होते. कोलकाताला अखेरच्या २ चेंडूत ६ धावांची गरज होती. त्याचवेळी राहुल त्रिपाठीने ५ व्या चेंडूवर षटकार ठोकत कोलकाताला विजय मिळवून दिला.
विशेष म्हणजे कोलकाताचे कार्तिक, मॉर्गन, शाकिब आणि नारायण या अनुक्रमे पाचव्या ते आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. तसेच कोलकाताने अखेरच्या ४ षटकात तब्बल ५ विकेट्स गमावल्या.
17th over – Avesh Khan 👉 2 runs, 1 wicket
18th over – Kagiso Rabada 👉 1 run, 1 wicket
19th over – Anrich Nortje 👉 3 runs, 1 wicket
20th over – Ravi Ashwin 👉 7 runs, 2 wicketsNothing but immense appreciation for the turnaround from our DC bowlers 💪#YehHaiNayiDilli #KKRvDC pic.twitter.com/KPqqRPyt9D
— Delhi Capitals (@DelhiCapitals) October 13, 2021
कोलकाताच्या गोलंदाजांची चमकदार कामगिरी
या सामन्यात कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवत दिल्लीला २० षटकांत ५ बाद १३५ धावांवर रोखले होते. दिल्लीकडून शिखर धवनने सर्वाधिक ३६ धावांची खेळी केली. तर श्रेयस अय्यरने नाबाद ३० धावा केल्या. अन्य फलंदाजांना फारसा प्रभाव टाकता आला नाही. कोलकाताकडून वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तर लॉकी फर्ग्युसन आणि शिवम मावी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
दोन ‘पुणेकर’ खेळाडू दिल्लीला पडले भारी, प्लेऑफमध्ये पराभवाला ठरले कारणीभूत, पाहा कामगिरी
Photo: शेवटच्या षटकात पराभूत झाल्यानंतर दिल्लीच्या ताफ्यात निराशेची लहर; पृथ्वी शॉ तर ढसाढसा रडला