शारजाह। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील क्वालिफायर २ सामना बुधवारी (१३ ऑक्टोबर) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात पार पडला. शारजाह क्रिकेट ग्राऊंडवर पार पडलेल्या या सामन्यात कोलकाताने अखेरच्या षटकात विजय मिळवला आणि अंतिम सामन्याचे तिकीट पक्के केले. कोलकातासाठी राहुल त्रिपाठीने अखेरच्या षटकात मारलेला षटकार विजय मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा ठरला. मात्र, दिल्लीचा या हंगामातील प्रवास इथेच थांबला.
दिल्लीने गुणतालिकेत अव्वल क्रमांक मिळवत प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्यांना पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून पराभूत व्हावे लागले. तर, दुसऱ्या क्वालिफायरमध्ये कोलकाताने पराभूत केल्याने त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. विशेष म्हणजे दिल्लीच्या प्लेऑफमधील दोन्ही सामन्यातील पराभवाचे मोठे कारण २ पुणेकर क्रिकेटपटू ठरले.
पुणेकर क्रिकेटपटू दिल्लीला पडले भारी
पहिल्या क्वालिफायरमध्ये दिल्लीविरुद्ध चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड हा सामानावीर ठरला. त्या सामन्यात त्याने दिल्लीने दिलेल्या १७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ५० चेंडूत ५ चौकार आणि २ षटकार खेचत ७० धावा केल्या होत्या. तसेच त्याने दुसऱ्या विकेटसाठी रॉबिन उथप्पासह महत्त्वाची ११० धावांची भागीदारी रचली होती. त्यामुळे चेन्नईला १७३ धावांचे मोठे आव्हान पार करताना मोठी मदत झाली होती. हा सामना चेन्नईने अखेरच्या षटकात जिंकला होता.
त्यानंतर, दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्लीला अखेरच्या षटकांमध्ये घेतलेल्या विकेट्समुळे विजयाची संधी निर्माण झाली होती. या सामन्यात दिल्लीने कोलकातासमोर १३६ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना व्यंकटेश अय्यर (५५) आणि शुबमन गिलने (४६) ९६ धावांची सलामी देत कोलकाताला चांगली सुरुवात दिली होती.
पण, कोलकाताने १५ व्या षटकानंतर लागोपाठ विकेट्स गमावल्या. मात्र, दुसऱ्या बाजूने राहुल त्रिपाठीने आपली विकेट वाचवून ठेवली होती. अखेरच्या षटकात कोलकाताला ७ धावांची गरज होती. यावेळी कोलकाताकडे ५ विकेट्स शिल्लक होत्या. आर अश्विनने गोलंदाजी केलेल्या या षटकात त्रिपाठीने पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली. पण, त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर कोलकाताचे शाकिब अल हसन आणि सुनील नारायण बाद झाले.
अखेर पाचव्या चेंडूवेळी त्रिपाठी स्ट्राईकवर आला. त्यावेळी कोलकाताला २ चेंडूत ६ धावांची गरज होती. यावेळी दिल्लीने केलेली गोलंदाजी पाहून अनेकांना कोलकाता पराभूत होणार असेच वाटत होते. पण राहुल त्रिपाठीने खणखणीत षटकार ठोकला आणि कोलकाताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. राहुल त्रिपाठी १२ धावांवर नाबाद राहिला.
विशेष म्हणजे ऋतुराज गायकवाड आणि राहुल त्रिपाठी हे दोघेही पुण्याचे रहिवासी आहेत. तसेच दोघांनी क्रिकेटचे महत्त्वाचे धडे पुण्यातच गिरवले आहे. दोघेही देशांतर्गत क्रिकेट महाराष्ट्राकडून खेळतात. त्याचबरोबर त्यांनी काही सामन्यांत महाराष्ट्राचे नेतृत्वही केले आहे. त्यामुळे एकप्रकारे असे म्हणता येऊ शकते की हे दोन पुणेकर क्रिकेटपटू दिल्लीसाठी प्लेऑफमध्ये सर्वात मोठी डोकेदुखी ठरले.
महत्त्वाच्या बातम्या –
Photo: शेवटच्या षटकात पराभूत झाल्यानंतर दिल्लीच्या ताफ्यात निराशेची लहर; पृथ्वी शॉ तर ढसाढसा रडला
Video: बॅड लक!! गिलनं घेतलेला अविश्वसनीय झेल, पण पंचांनी तो निर्णय दिला अन् हेटमायर ठरला नाबाद
धवनची पुन्हा कासवगती खेळी; कारकीर्दीत इतक्यांदा ओढवलीय नामुष्की






