पाकिस्तानचा संघ सध्या (Pakistan cricket team) इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे, जिथे ते 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहेत. मालिकेतील पहिल्या सामन्यात त्यांना अवघ्या तीन दिवसांतच पराभवाचा सामना करावा लागला होता. आता या मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्स स्टेडियमवर खेळवला जात असून, यात पाकिस्तानी कसोटी संघाचा कर्णधार बाबर आझमचं (Babar Azam) प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन झालं आहे.
हेडिंग्ले येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात उजव्या हाताच्या दुखापतीमुळे बाबर आझम खेळू शकला नव्हता, तेव्हा त्याच्या जागी सलमान अली आगाने (Salman Ali Agha) कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. आता बाबर आझमच्या पुनरागमनमुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये केवळ एकच बदल झाला असून, गेल्या सामन्यात कर्णधारपद भूषवणाऱ्या सलमान अली आगाला संघातून वगळण्यात आलं आहे, तर इतर सर्व खेळाडूंनी संघात आपली जागा राखण्यात यश मिळवलं आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पाकिस्तानी संघाच्या पराभवाचं मुख्य कारण त्यांची खराब फलंदाजी राहिली. असं असतानाही, संपूर्ण खापर केवळ सलमान अली आगावर फोडण्यात आलं. यामागे बाबर आझमची अंतर्गत असुरक्षितता हे मुख्य कारण मानले जात आहे, कारण बाबर नेहमीच स्वतःच्या स्थानाबद्दल साशंक असतो, अशी चर्चा वारंवार सुरू असते.
लॉर्ड्स कसोटीत टॉस जिंकल्यानंतर बोलताना बाबर आझम म्हणाला, आम्ही प्रथम गोलंदाजी करू, कारण आकाशात ढग दाटले आहेत आणि पिचवर गवत आहे, त्यामुळे या परिस्थितीचा फायदा घेण्याचा आमचा प्रयत्न असेल.
प्लेइंग इलेव्हनमध्ये एकच बदल आहे, सलमान अली आगा खेळत नाहीये आणि मी संघात परतलो आहे. हेडिंग्लेमध्ये आमची फलंदाजी अपेक्षेप्रमाणे झाली नव्हती आणि आम्ही आमच्या चुकांवर सविस्तर चर्चा केली आहे. म्हणूनच आम्ही येथे आलो आहोत आणि या सामन्यात आमची सर्वोत्कृष्ट कामगिरी देण्याचा प्रयत्न करू. लॉर्ड्सवर खेळणे नेहमीच अभिमानाची गोष्ट असते आणि एक कर्णधार म्हणून माझ्यासाठी हा क्षण खूप खास आहे. त्यामुळे आम्ही उत्तम कामगिरी करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू.
लॉर्ड्स कसोटी सामन्यात पाकिस्तानची सुरुवात खूपच चमकदार झाली. त्यांनी इंग्लंडची सलामीची जोडी अल्पावधीतच पव्हेलियन परत पाठवली. पहिल्या सत्राचा खेळ संपण्यापर्यंत त्यांनी इंग्लंडचे 80 धावांवर 4 फलंदाज बाद केले होते. यात मोहम्मद अब्बासने 3 विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद अली 1 खेळाडू बाद करण्यात यशस्वी ठरला.






