---Advertisement---

IND vs SL: कोलंबो कसोटी ड्रॉ झाल्यामुळे डब्ल्यूटीसी गुणतालिकेत टीम इंडियाला मोठा झटका! कसं असणार समीकरण

On: गुरूवार, ऑगस्ट 27, 2026 8:32 PM
---Advertisement---

भारत आणि श्रीलंका (India vs Srilanka) यांच्यात कोलंबोमध्ये खेळला गेलेला दुसरा कसोटी सामना गुरुवारी (27 ऑगस्ट) अनिर्णित (ड्रॉ) संपला. चौथ्या दिवसापर्यंत शुबमन गिलच्या (Shubman gill under captaincy) नेतृत्वाखालील टीम इंडिया हा सामना सहज जिंकेल असं वाटतं होतं, पण पाचव्या दिवशी श्रीलंका संघाने जोरदार कामगिरी केली. यजमान संघाने शेवटच्या दिवशी शानदार फलंदाजी करत सामना ड्रॉ केला. यासह टीम इंडियाने मालिका 1-0 ने आपल्या नावावर केली.

या कामगिरीनंतर भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) 2025-27 गुणतालिकेत नेमका कोणत्या स्थानावर आहे आणि संघाच्या फायनलमध्ये पोहोचण्याच्या संधी किती आहेत, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

तर, हा सामना जिंकला असता तर टीम इंडियाची विजय मिळवण्याची टक्केवारी 60 च्या पुढे गेली असती. यामुळे संघ पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर पोहोचू शकला असता, पण सामना ड्रॉ झाल्यामुळे संघ अजूनही पाचव्याच स्थानी कायम आहे. ड्रॉमुळे टीम इंडियाची पीसीटी (विजय मिळवण्याची टक्केवारी) 53.33 वरून घसरून 51.51 झाली आहे.

या स्पर्धेत भारताला आता आणखी 7 सामने खेळायचे आहेत, ज्यामध्ये न्यूझीलंडविरुद्ध 2 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांचा समावेश आहे. सामना ड्रॉ झाल्यामुळे टीम इंडियाच्या WTC फायनलच्या मार्गात नक्कीच अडथळा निर्माण झाला आहे. मात्र, संघाकडे अद्याप फायनलमध्ये पोहोचण्याची संधी आहे. फायनलचा प्रवास सुकर करण्यासाठी पीसीटी किमान 60 टक्के असणे गरजेचे आहे. यापेक्षा कमी टक्केवारी टीम इंडियासाठी फायदेशीर ठरणार नाही. कारण पहिल्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाची पीसीटी 80% आणि दुसऱ्या क्रमांकावरील दक्षिण आफ्रिकेची 75% इतकी आहे.

आता इथून पुढे भारताने उरलेले सर्व 7 सामने जिंकले, तर फायनलमध्ये जाण्याच्या त्यांच्या संधी अतिशय मजबूत होतील. त्यामुळे आता या वेळेस टीम इंडिया फायनलपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरते का, हे पाहणे रंजक ठरेल. याआधीच्या 2023-25 च्या WTC चक्रातही टीम इंडियाला फायनल गाठता आली नव्हती. त्याआधीच्या दोन्ही चक्रांमध्ये संघाने फायनलपर्यंत मजल मारली होती, जिथे पहिल्या चक्रात न्यूझीलंडविरुद्ध तर दुसऱ्या चक्रात ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---