---Advertisement---

स्व.अनिल कर्पे स्मृती “पुरुष-महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला सुरवात.

On: शुक्रवार, डिसेंबर 27, 2019 1:56 PM
---Advertisement---

ठाणे दि. २७ :- राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स, शिवतेज मंडळ, होतकरू मंडळ यांनी नव तरुण क्रीडा मंडळाने “ स्व. अनिल महादेव कर्पे स्मृती प्रित्यर्थ” आयोजित केलेल्या राज्यस्तरीय महिला गटात विजयी सलामी दिली. पुरुषांत जॉली स्पोर्ट्स क्लब, स्वस्तिक क्रीडा मंडळ, स्व.आकाश क्रीडा मंडळ, केदारनाथ क्रीडा मंडळ, सत्यम सेवा मंडळ, जय शिव मंडळ यांनी साखळी सामन्यात पहिल्या विजयाची नोंद केली.

कोळशेवाडी- कल्याण(पूर्व) येथील स्व. दादासाहेब गायकवाड क्रीडांगणावर सुरू झालेल्या राज्यस्तरीय सामन्यातील महिलांच्या अ गटातील महिलांच्या उदघाटनिय सामन्यात ठाण्याच्या राफ नाईक स्पोर्ट्सने ररायगडच्या कर्नाळा स्पोर्ट्सचा ४१-१८ सहज पराभव करीत पहिल्या साखळी विजयाची नोंद केली. मध्यांतराला १५-०९अशी आघाडी घेणाऱ्या राफ नाईकने मध्यांतरानंतर आपला खेळ आणखी गतिमान करीत २३ गुणांच्या मोठ्या फरकाने विजय मिळविला. दर्शना सणस, उर्मिला नादावडेकर यांच्या झंजावाती चढाया आणि छाया कोळी, तनुजा पाटील यांचा भक्कम बचाव याला या विजयाचे श्रेय जाते. कर्नाळा स्पोर्ट्सकडून रश्मी पाटील, निमिषा म्हात्रे, अपेक्षा शिंदे बऱ्या खेळल्या.

राफ नाईक संघाचा या विजयाचा आनंद फार काळ टिकला नाही. त्यानंतर झालेल्या सामन्यात पुण्याच्या राजमाता जिजाऊ स्पोर्ट्सने त्यांना ५४-२६ असे पराभूत केले. सलोनी गजमल, मानसी सावंत, ऋतुजा निगडे यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर विश्रांतीला ३०-०४ अशी मोठी आघाडी घेणाऱ्या राजमाताला विश्रांतीनंतर राफने कडवी लढत दिली. राफच्या दर्शना सणस, मनीषा चिकणे यांनी विश्रांतीनंतर जोरदार खेळ केला. पण मध्यांतरातील आघाडी काय कमी करणे त्यांना जमले नाही.

Photo Courtesy: Dinesh Ghadigaonkar

महिलांच्या ब गटात ठाण्याच्या शिवतेज मंडळाने औरंगाबादच्या साई सेन्टरचा ४९-३१ असा पाडाव केला. पहिल्या डावात २५-१५ अशी आघाडी घेणाऱ्या शिवतेजने दुसऱ्या डावात देखील आपल्या खेळात सातत्य राखत हा विजय साकारला. माधुरी गवंडी, प्रगती भुरटे शिवतेजकडून, तर ऋतुजा वावगे, कोमल ससावे साई सेन्टरकडून उत्कृष्ट खेळल्या.

क गटात ठाण्याच्या होतकरु मंडळाने मुंबई उपनगरच्या महात्मा फुले स्पोर्टसला ३१-२१ असे नमविलें. मध्यांतरापर्यंत चुरशीने खेळलेल्या या सामन्यात ११-०९अशी आघाडी होतकरूकडे होती. श्रुती निले, राजश्री टिळे यांनी उत्तरार्धात आपल्या खेळाची गती वाढवीत हा सामना १० गुणांनी जिंकला. तर महात्मा गांधी स्पोर्ट्सने ठाण्याच्या ज्ञानशक्ती क्रीडा मंडळाचा ६६-२९ असा पराभव केला. सायली जाधव, तेजश्री पाटेकर, ग्रंथाली हांडे, साक्षी गावडे यांच्या चढाई- पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. लक्ष्मी गायकर, मानसी गायकर, निधी जोशी ज्ञानशक्तीकडून बऱ्या खेळल्या.

पुरुषांच्या अ गटात मुंबई उपनगरच्या जॉली स्पोर्ट्सने रायगडच्या रण झुंजार क्रीडा मंडळावर ३०-२१ असा विजय मिळविला. पूर्वार्धात विजयी संघाकडे १७-१० अशी आघाडी होती. नामदेव इस्वलकर, अनिकेत पाईलकर जॉलीकडून, तर विशाल आणि कल्पेश पाटील बंधू रण झुंजारकडून छान खेळले. मुंबई उपनगरच्या केदारनाथ क्रीडा मंडळाने ठाण्याच्या ओम कबड्डी संघाचा २६-२० असा पराभव केला. सागर आणि चेतन या कदम बंधूंच्या चतुरस्त्र खेळाने केदारनाथच्या विजयाची किमया साधली. उत्तरार्धात ओम कल्याणच्या पंकज चव्हाण, राहुल भोसले यांच्या उत्तरार्धातील उत्कृष्ट खेळाने सामन्यातील रंगत वाढविली.

फ गटात ठाण्याच्या जय शिव मंडळाने मुंबई शहरच्या गुड मॉर्निग स्पोर्टसला ३५-२३ असे नमवित आगेकूच केली. मध्यांतराला जय शिवकडे १८-११अशी आश्वासक आघाडी होती. अनिकेत चिकणे, वृषभ कुलकर्णी, विपुल घोष्टेकर जय शिवकडून, तर तन्मय सावंत, रितेश भाटकर, नितीन सावंत गुड मॉर्निगकडून उत्कृष्ट खेळले. सामन्यांचे उदघाटन विभागीय आमदार गणपतशेठ गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.

Photo Courtesy: Dinesh Ghadigaonkar

पुरुषाच्या क गटात स्व. आकाश क्रीडा मंडळ विजयी विरुद्ध रेल्वे बॉईज स्पोर्ट्स (३७-२१), स्वस्तिक क्रीडा मंडळ वि वि गोलफादेवी सेवा मंडळ (३८-१८), सत्यम सेवा मंडळ वि वि हुतात्मा शांताराम क्रीडा मंडळ (४४-२०).

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---