---Advertisement---

VIDEO: अबब! पठ्ठ्याने 100 किमी अन् 14 तास धावत टाकला बॉल, वर्ल्ड रेकॉर्डच्या नादात केली भन्नाट बॉलिंग

On: बुधवार, सप्टेंबर 2, 2026 4:03 PM
---Advertisement---

क्रिकेटमध्ये गोलंदाजांचा रन-अप हा काहीच पावलांचा असतो, मात्र एक इंग्लिश क्रिकेटपटू याला अपवाद ठरला आहे. त्याने काही पावलांचे अंतर तब्बल 100 किलोमीटरपर्यंत वाढवले. सॅम बोडोआनो याने, विश्वविक्रम करण्याच्या नादात हा प्रकार केला. त्याने क्रिकेटचा चेंडू टाकण्याआधी 62 मैल म्हणजेच जवळपास 100 किलोमीटर धावला. तो इन्स्टाग्रामवर आयर्नबॉड्झ (IronBodz) या नावाने ओळखला जातो

बीबीसीच्या वृत्तानुसार, सॅमने शनिवारी ऐतिहासिक लॉर्डस क्रिकेट मैदानावरून आपल्या या अनोख्या कामगिरीची सुरूवात केली. तो जवळपास 14 तासांनंतर रविवारी वोकिंगमधील व्हॅली एंड क्रिकेट क्लबमध्ये पोहोचला. तिथे पोहोचल्यावर त्याने आपल्या वडिलांना सामन्याचा पहिला चेंडू टाकून आपल्या विक्रमी रन-अपची सांगता केली.

यादरम्यान सॅमने द रूथ स्ट्रॉस फाउंडेशन या कर्करोग संस्थेसाठी जवळपास 6000 पाउंड जमा केले.

रेकॉर्डसाठी काही अटीही होत्या…
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या नियमानुसार, सॅमला केवळ 100 किलोमीटर हातात चेंडू घेऊन धावायचे नव्हते, तर त्याला संपूर्ण शर्यतभर हाता क्रिकेटचा चेंडू धरून पूर्ण क्रिकेटच्या पांढऱ्या जर्सीमध्ये धावावे लागले. तसेच त्याला शर्यत पूर्ण करून पहिला चेंडू टाकल्यानंतर एका अधिकृत सामन्यात खेळावे लागले. त्या सामन्यात बाकीच्या सामन्यांप्रमाणे एक पंच, दोन संघ होते.

सॅमचे नाव अद्याप अधिकृतपणे विक्रमांच्या पुस्तकात नोंदवले गेलेले नाही. त्याने विक्रमाच्या प्रयत्नांसाठी असलेल्या सर्व अटी मानल्या, मात्र त्याच्या या अनोख्या कामगिरीला अद्याप अधिकृत मान्यता मिळालेली नाही. त्या घटनेची सर्व तपासणी केली जाणार असून त्या प्रक्रियेला दोन आठवडे लागण्याची शक्यता आहे. त्याच्या विक्रमाला मान्यता मिळाली तर तो मोठ्या फरकाने मागील विक्रम मोडले.

जुना विक्रम 24 किलोमीटरचा
पुरुषांच्या क्रिकेटमध्ये सर्वात लांब रन-अपचा विक्रम टॉम डन यांच्या नावावर. त्यांनी ऑगस्ट 2024 मध्ये पूर्व लंडनमधील बेथनल ग्रीनपासून दक्षिण लंडनमधील वॅंड्सवर्थ कॉमनपर्यंत अंदाजे 24 किलोमीटर अंतर पार केले होते.

टॉमचा व्हिडिओ पाहिल्यानंतर सॅमला कल्पना सुचली. त्याला वाटले जर 24 किलोमीटरची धावपट्टी शक्य असेल, तर तो त्यापेक्षा अधिक अंतर पार करू शकतो. आता सर्वांचे लक्ष सॅमचा विक्रमाला अधिकृत मान्यता मिळणार की नाही याकडे आहे. (Sam Bodoano attempt for Guinness World Record for longest bowling run-up ever)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---