महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने शिवनेरी सेवा मंडळ, दादर पूर्व आयोजित राज्यस्तरीय पुरुष व्यावसायिक व महिला स्थानिक गटाची कबड्डी स्पर्धा १९ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी या कालावधीमध्ये होणार आहे.
शिवनेरी सेवा मंडळ, दादर मंडळाचे संस्थापक नगरसेवक कै. मोहन राजाराम नाईक यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त आणि त्याच्या २५ व्या स्मृती दिनानिमित्त तसेच शिवनेरी सेवा मंडळाच्या ५० व्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून यंदा नगरसेवक कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन दादर पूर्व येथील भवानीमाता क्रीडांगणावर करण्यात आले आहे.
सदर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरूष व्यावसायिक गटाचे १६ संघ सहभागी होणार आहेत. तर स्थानिक महिला गटाचे १२ संघ सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा मॅटवर खेळविण्यात येणार असल्यामुळे मॅट सम पातळीत लावण्याचे काम जोरात सुरू आहे. तीन मॅटची क्रीडांगणे तयार करण्यात आली असून कबड्डी रसिकांसाठी भव्य गॅलरी तयार करण्यात आली आहे.
पुरुष व्यावसायिक गटात एअर इंडिया, महिंद्रा, मध्य रेल्वे, युनियन बँक, सेंट्रल बँक, देना बँक, मुंबई बंदर, रायगड पोलीस, ठाणे पोलीस, जे जे हॉस्पीटल आदी नामवंत १६ संघांना सहभाग देण्यात आला आहे. महिला गटात शिवशक्ती, अमरहिंद, डॉ. शिरोडकर, महात्मा गांधी, स्वराज्य, संघर्ष, सुवर्णयुग, शिवतेज, अनिकेत, होतकरू आदी १२संघांना प्रवेश देण्यात आला आहे. पुरुष गटातील विजयी संघास १,००,००० रु. तर उपविजयी संघास ५०,००० रु. व चषक आणि महिला गटातील विजयी संघास ५०,००० रु. तर उपविजयी संघास २५,००० रु. व चषक देण्यात येणार आहे. स्पर्धेतील उत्कृष्ट पुरुष खेळाडूस बाईक तर महिला खेळाडूस स्कुटी देण्यात येणार आहे.
या स्पर्धेच्या निमित्ताने प्रो-कबड्डीत खेळलेल्या नामवंत खेळाडूंचा खेळ पहाण्याची दादरकराना पहाण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेचे उदघाटन मंगळवार दि.१९ फेब्रु.रोजी सायं. ६:३० वा. खासदार राहुल शेवाळे, महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.चे कार्याध्यक्ष खासदार गजानन कीर्तिकर, जयपूर पिंक पँथरचे बंटी वालिया यांच्या उपस्थितीत होणार आहे.