भावनी माता मैदान दादर (पूर्व) येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धाचे शिवनेरी सेवा मंडळाचे संस्थापक मोहन राजाराम नाईक यांच्या स्मरणार्थ आयोजन खेळव आहे. या स्पर्धाला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण चषक नावाने सुद्धा ओळखले जाते. काळ दुसऱ्या दिवशी साखळी सामने पार पडले.
महिला गटात शिवशक्ती मुंबई, जागृती पुणे, महात्मा गांधी उपनगर, स्वराज्य उपनगर यांनी बादफेरीत प्रवेश निश्चित केला. तर पुरुष गटात महिंद्रा अँड महिंद्रा, सेन्ट्रल बँक, जे. जे. हॉस्पिटल, देना बँक यांनी बादफेरी गाठली आहे. साखळीतील काही सामने शिल्लक असून आज सायंकाळी बादफेरीचे चित्र स्पष्ट होईल.
पुरुष विभागात झालेल्या मुंबई बंदर विरुद्ध रायगड पोलीस यांच्यात अटीतटीचा सामना झाला. मध्यंतरापर्यत १५-११ अशी आघाडी रायगड पोलीस संघाकडे होती. चढाईत राजू पाटील तर पकडमध्ये दीपक कासरे यांनी उत्कृष्ट खेळ केला. रायगड पोलीस संघाने ३०-२७ असा सामना जिंकला. मुंबई बंदरने युनियन बँकेचा २७-२५ असा पराभव करत स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत ठेवले आहे.
सेन्ट्रल रेल्वे विरुद्ध सेंट्रल बँक यांच्यात झालेल्या सामन्यात सेन्ट्रल बँकने ३९-३५ अशी बाजी मारली. मध्यंतराला १४-१० अशी आघाडी असूनही रेल्वेने हा गमावला. सेंट्रल बँक कडून ओमकार मोरे व धनंजय सिरोज यांनी चांगला खेळ केला. बँक ऑफ महाराष्ट्र विरुद्ध न्यू इंडिया इन्शुरन्स यांच्यात बँक ऑफ इंडियाने २८-२२ अशी बाजी मारली.
जे. जे. हॉस्पिटल ने ठाणे पोलीस संघाचा ३५-१२ तर बँक ऑफ महाराष्ट्र संघाचा ४४-२२ असा पराभव करून बादफेरीत प्रवेश निश्चित केला. तर देना बँकने ठाणे पोलीस संघाला ५२-२३ असे नमवत बादफेरी गाठली.
महिला गटात शिवतेज ठाणे विरुद्ध शिवओम पुणे यांच्यात शिवतेज ठाणे संघाने ३४-२८ असा विजय मिळवला. मध्यंतरला २४-०८ अशी भक्कम आघाडी असूनही शिवतेजला मध्यंतरानंतर झुंझावे लागले. शिवतेज कडून निकिता कदम व प्रणाली मोरे यांनी चांगला खेळ केला. सुवर्णयुग पुणे विरुद्ध संघर्ष उपनगर यांच्यातील सामना ३४-३४ असा बरोबरीत राहिला.
अ गटात जागृती प्रतिष्टान पुणे संघाने होतकरू ठाणे संघाचा ४३-२३ असा सहज पराभव केला. तर शिवशक्ती महिला संघाने होतकरू ठाणेचा ५०-१२ असा पराभव केला. दोन पराभव मुळे होतकरू संघाचे आव्हान संपुष्टात आले. स्वराज्य, उपनगरने महात्मा फुले संघाचा ३५-२२ असा पराभव करत बादफेरीत प्रवेश मिळवला.
पुरुष व महिला दोन्ही विभागातील साखळीतील काही महत्वपूर्ण लढती शिल्लक असून आज सायंकाळी बादफेरीच्या लढतीचे चित्र स्पष्ट होईल.