भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीगची धूम आहे. या दरम्यान क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. इंग्लंडचे दिग्गज फिरकीपटू डेरेक अंडरवूड यांचं निधन झालंय. आपल्या काळातील सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक असलेल्या डेरेक अंडरवूड यांनी सोमवारी (15 एप्रिल) वयाच्या 78 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आयसीसीनं अंडरवूड यांचा आपल्या ‘हॉल ऑफ फेम’ मध्ये समावेश केला होता.
डेरेक अंडरवूड यांनी आपल्या गोलंदाजीनं भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांना अनेक वेळा अडचणीत आणलं होतं. 60 आणि 70 च्या दशकात त्यांच्याविरुद्ध खेळणं मोठं आव्हानात्मक असायचं. त्या काळातीत मोठमोठे फलंदाज त्यांच्यासमोर धावा काढण्यासाठी धडपडायचे.
डेरेक अंडरवूड आजही कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडसाठी सर्वाधिक बळी घेणारे फिरकी गोलंदाज आहेत. त्यांच्या नावावर 86 कसोटी सामन्यांमध्ये 297 विकेट आहेत. याशिवाय त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जवळपास 2500 विकेट्स घेतल्या आहेत.
अंडरवूड यांनी 24 वर्षांच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत 2465 विकेट घेतल्या आहेत. 1977 मध्ये भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत त्यांनी 29 विकेट घेतल्या होत्या. त्यांच्या कामगिरीच्या जोरावर इंग्लंडनं मालिका 3-1 नं जिंकली होती. 1933-34 नंतर इंग्लंडचा भारतावरील हा पहिला विजय होता.
अंडरवूड यांनी सुनील गावस्कर यांना कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक (12) वेळा बाद केलं आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खान आणि वेस्ट इंडिजचा महान वेगवान गोलंदाज मायकल होल्डिंग यांनी गावस्कर यांना कसोटी क्रिकेटमध्ये 11-11 वेळा बाद केलंय.
अंडरवूड यांच्या बद्दल बोलताना सुनील गावस्कर म्हणाले होते की, “अंडरवूडला कोणत्याही परिस्थितीत सामोरं जाणं खूप कठीण आहे. तो खूप अचूक गोलंदाजी करायचा आणि चेंडू सरळ स्टंपवरच टाकायचा. तो मनात आलं तेव्हा पटकन चेंडू टाकत असे, त्यामुळे तुम्हाला शॉट खेळण्यासाठी आधीच पोजिशनमध्ये रहावं लागत असे. तो आणि अँडी रॉबर्ट्स हे मी खेळलेले सर्वात कठीण गोलंदाज होते.”
महत्त्वाच्या बातम्या –
“आरसीबीला विकून टाका…”, सततच्या पराभवामुळे दिग्गज टेनिसपटूचा संताप; बीसीसीआयला दिला अजब सल्ला
दिनेश कार्तिक, रिंकू सिंह की हार्दिक पांड्या? टी20 विश्वचषकात कोण असेल टीम इंडियाचा फिनिशर?