– संजय दुधाणे
हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांना देवाज्ञा. वयाच्या 86 व्या वर्षी पुणे येथे इहलोकीची यात्रा संपली. शेतकरी कुटुंबातले गणपतराव आंदळकर १९५० मध्ये खास कुस्तीसाठी कोल्हापुरात आले.
एकमेवव्दितीय अर्जूनवीर
कुस्तीसारख्या मराठमोळ्या खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवायचे असेल तर पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड हवी असे तत्त्व स्वत: अंमलात आणून आपल्या शिष्यांनाही त्याप्रमाणे अनुकरण करायला लावणारे प्रशिक्षक क्वचितच आढळून येतात. हिंदकेसरी गणपतराव आंदळकर हे अशाच मोजक्यांपैकी.
गणपतराव यांनी स्पर्धात्मक कुस्ती कारकिर्दीत मातीवरच अनेक मैदाने जिंकली, मात्र बदलत्या काळानुसार या खेळाला नावीन्याची व आंतरराष्ट्रीय स्तरावरील बदलाची जोड दिली पाहिजे हे त्यांनी ओळखले व अंमलात आणले. जाकार्ता येथे 1962 मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी ग्रीकोरोमन विभागात सुवर्णपदक तर फ्रीस्टाइलमध्ये रौप्यपदकाची कमाई करीत मुलखावेगळी कामगिरी केली. त्यापूर्वी लाल मातीतील हिंदकेसरीतही महाराष्ट्राची शान उंचावली.
शेतकरी कुटुंबात 15 एप्रिल 1935 साली आंदळी या छोट्याशा गावात गणपतरावांचा जन्म झाला. गावाच्या नावावरून त्याचे आडनाव आंदळकर पडले. ते उडीच वर्षाचे असताना कोल्हापूर जिल्हातील शिराळा तालुक्यातील पुनवत येथील आजीने त्याना दत्तक घेतले. शेतातील कामे आणि गावातील तालमीच्या व्यायामाने पिळदार शरीर कमविलेल्या गणपतराव 1950 मध्ये खास कुस्तीसाठी कोल्हापुरात आले.
राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरची ओळख कुस्तीपंढरी अशी निर्माण केली होती. देशभरातील मल्ल इथे कुस्तीसाठी येत होते. त्यामुळे जवळच्याच पुनवत गावातील गणपतराव आंदळकरांनीही कोल्हापुरात येणे स्वाभाविक होते.
मोतीबाग तालमीत गणपतरावांची जडणघडण झाली. बाबूराव बिरे हे त्यांना वस्ताद म्हणून लाभले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कुस्तीकौशल्याची वाटचाल अजिंक्यच्या दिशेने होत गेली. आंदळकरांच्या उमेदीचा काळ हे कुस्तीचे सुवर्णयुग होते. कुस्तीला प्रतिष्ठा होती आणि मल्लांना ग्लॅमर होते. याच काळात खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवले होते, ते कोल्हापुरात सराव करूनच.
बिरे वस्तादांनी गणपतरावांना स्पर्धात्मक मल्लविद्येचा यशोमंत्र दिला. मोठी कुस्ती खेळण्याच्या महत्त्वाकांक्षाचे बीज त्यांच्या मनी पेरले गेले. त्यांची पहिली जाहिर कुस्ती केशव पाटील भेडसगांवकर यांच्याशी ठरली. पहिल्याच कुस्तीत चीतपट चमक दाखवीत गणपतरावाच्या कारकिर्दीचा श्रीगणेशा झाला. पहाता-पहाता कोल्हापूर पंचक्रोशीत गणपत आंदळकर नावाचा बोलबाला होऊ लागला.
मोती पंजाबी, मंंगल राय, हनीफ महंमद, सुखदेव भैया अशा अनेक सामर्थ्यशाली मल्लांविरूध्द त्याचा मुकाबला रंगला. अनेकांना त्यांनी डोळ्याचं पातं न लवताच उस्मान दाखवले होते. गणपतरावांच्या या विजयी घोडदौडीकडे सार्या महाराष्ट्राचे लक्ष वेधले. त्यांच्या लाल मातीतील पराक्रमाची दखल घेत 1960 च्या हिंदकेसरी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात त्यांची निवड करण्यात आली.
नववर्षी मुंंबईच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये हिंदकेसरी स्पर्धेचे रणशिंग वाजले. खरं तर या स्पर्धेत गणपतरावांची गटाच्या कुस्तीत निवड झाली होती. ते हिंदकेसरी किताबाची कुस्ती खेळणार नव्हते. स्पर्धेच्या दुसर्या दिवशी ते दुपारचे जेवण करून इतर कुस्त्या पहाण्यासाठी पटेल स्टेडियमच्या मैदानात बसले. तेव्हा अचानकपणे महाराष्ट्रातील संयोजकांनी गणपतरावांना हिंदकेसरी स्पर्धा खेळण्याची गळ घातली. जेवणानंतर लगेच कुस्ती करणे शक्यच नव्हते. सुरूवातीला त्यानी नकारच दिला होता.
महाराष्ट्राच्या मातीची शान पुन्हा हिंदकेसरी उंचविण्यासाठी ते दुसर्या दिवशी स्पर्धेसाठी सज्ज झाले. राज्याची राजधानी मुंबईनगरीत होणार्या स्पर्धेत मराठी पाऊल मागे हटले नाही. सलामीच्या कुस्त्या जिंकल्यानंतर उपांत्यफेरीत त्यांची गाठ बंत्तासिंगशी पडली. घरच्या कुस्तीशौकिनांच्या पाठबळावर त्यांनी मैदान गाजवून अंतिम फेरीत धडक मारली.
आता पंजाबचाच कसलेला कुस्तीगीर खडकसिंगविरूध्द त्यांचा करो या मरो ची लढत होती. पिता-पुत्र वयाची अशी ही ऐतिहासिक कुस्ती रंगणार होती. खडकसिंग यांचे वय 54 तर आंदळकर तरूण बांड केवळ 27 वर्षांचे. तरीही खडकसिंग यांचे चापल्य, चिकाटी आणि खिलाडूवृत्ती वाखाण्यासारखी होती. अनुभवाच्या जोरावर जीवनात एकदा तरी हिंदकेसरी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून ते मुंबईच्या हिंदकेसरी आखाडयात पहिल्या दिवसापासून लक्षवेधी ठरले होते.
मुंबई राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, बांधकाममंत्री बाळासाहेब देसाई, अर्थमंत्री जीवराज मेहता, कुस्तीमहर्षी मामासाहेब मोहोळ यांच्यासारख्या कुस्तीशौकिनांमुळेच पटेल स्टेडियमाची शोभा वाढली होती.
अमृतसरचा मल्ल खडकसिंग विरूध्द कोल्हापूरचा कुस्तीगीर गणपत आंदळकर यांच्यात 7 फेंब्रुवारी 1960 रोजी हिंदकेसरी किताबाची संग्राम रंगणार होता. किताबाची लढतींसाठी वेळ निर्धारीत होती. चाळीस मिनिटे. सलामी होताच नवख्या गणपतरावांनी उसळी मारली. पहिल्याच मिनिटाला एकेरी पट काढून खडकसिंगला खाली घेतले. चपळ खडकसिंग चापावर फिरून वर आले. त्यांनी दुहेरी पट काढित गणपतरावांवर कुरघोडी केली, वेळीच सावध होत मराठी तरूण मल्लांनी बचाव केला. वय झालेल्या खडकसिंगला खेळ सुरूवातीच्या लढतीपेक्षा थोडा धीमा झाला होता. याचा पुरेपुर फायदा गणपतरावांनी उठविला. पुन्हा एकेरी पटाचा यशस्वी खेळ करीत गणपतरावांनी खडकसिंगला खाली पाडले. 11 मिनिटे काहीच करू दिले नाही. कुस्ती निरस, कंटाळवाणी होत चालली होती. कुस्ती आखाड्याबाहेरील दोरीवर गेल्याने पुन्हा मधोमध आणून खेळ सुरू करण्यात आला.
पुन्हा कुस्ती सुरू होताच घुटना डावावर खडकसिंगना चीत करण्याचा प्रयत्न गणपतरावांनी केला. निरस वातावरणात पुन्हा जान आली. मात्र पुन्हा चापावर फिरून पंजाबी मल्ल निसटला. सहज हार मारणार तो पंजाबी मल्ल कसला. त्यानेही सर्वशक्ती एक करून खडी टांग देऊन गणापतरावांना पाडण्याचा प्रयास केला. सावध असलेले गणपतराव पुन्हा बचावले. शेवटच्या 13 मिनिटांपूर्वी कुस्तीत चपळता प्रकटली.
शेवटी पुन्हा गणपतरावांनी खडकसिंगला पट काढून खाली घेतले आणि निर्धारीत चाळीस मिनिटी संपल्याची शिट्टी वाजली. चितपट कुस्तीचा खेळ न झाल्याने मराठी कुस्तीशौकिन थोडे निराश झाले तरी त्यांच्या चेहरावर मराठी मल्ल सलग दुसर्यांदा हिंदकेसरी झाल्याचा आनंद ओसांडून वाहत होता. 10 विरूध्द 5 गुणांनी गणपत आंदळकरांनी हिंदकेसरी गदा खेचून आणली होती.
सलग दुसर्यांदा महाराष्ट्राच्या रागड्या मल्लांनी हिंदकेसरीवर नाव कोरले होते. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी अडीचशे किलो वजनांची गदा गणपत आंदळकरांना दिले तो क्षण महाराष्ट्राच्या कुस्तीकलेच्या गौरवाचा होता. मानाचा पट्टा व सुवर्णपदकही बहाल केले.
हिंदकेसरी हा मुकुट धारण केल्यानंतर गणपत आंदळकरांनी मागे वळून पाहिलेच नाही. 1960 मध्ये त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाचा करिश्मा घडवित मातीबरोबरच मॅटच्या कुस्तीत आपली हुकुूमत प्रस्थापित केली.
1962 मध्ये जकार्ता येथे झालेल्या अशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी सुपर हेवी गटात ग्रीको रोमन स्टाइलमध्ये सुवर्णपदक तर फ्री स्टाइलमध्ये रौप्यपदक पटकावले. खरे तर फ्रीस्टाइलमध्येही त्यांना सुवर्णपदक मिळाले असते. मात्र अंतिम फेरीची लढत बरोबरीत सुटल्यानंतर दोन्ही खेळाडूंच्या वजनावर लढतीचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये गणपतराव यांचे वजन त्यांच्या प्रतिस्पर्धी खेळाडूपेक्षा काही ग्रॅमच जास्त होते. एकाच वेळी कुस्तीच्या दोन्ही शैलींमध्ये आशियाई पदक पटकविणारे मल्ल क्वचितच आढळून येतात.
गणपतरावांनी दोनशेहून अधिक कुस्त्या जिंकल्या. त्यापैकी चाळीसपेक्षा जास्त लढतींमध्ये त्यांनी पाकिस्तानच्या पहिलवानांवर मात केली. त्यामुळेच की काय पूर्वी पाकिस्तानचे मल्ल भारतात आले की आवर्जून कोल्हापूर येथील मोतीबाग तालमीत आंदळकर कसा सराव करतात हे पाहूनच जात असत. लपेट, कलाजंग, एकेरीपट, एकलंघी आदी अनेक डावांबाबत आंदळकर हे तरबेज मल्ल मानले जात. सादिक पंजाबी हा त्या वेळी अजिंक्य मल्ल मानला जाई. मात्र आंदळकर यांनी त्याला तब्बल 35 मिनिटे झुंज देत चीत केले. पाकिस्तानी मल्ल गोगा पंजाबी, सादिक पंजाबी, जिरा पंजाबी, नसिर पंजाबी, दिल्लीचा खडकसिंग पंजाबी, अमृतसरचा बंत्तासिंग पंजाबी, पतियाळाचा रोहेराम, लिलाराम, पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे, महंमद हनिफ, श्रीरंग जाधव या नामवंत मल्लाबरोबरीच्या त्यांच्या लढती गाजल्या.
1964 मध्ये टोकिओ ऑलिपिंकमध्ये हेवी गटात भारतीय कुस्ती संघाचे नेतृत्व आंदळकर यांनी केले. तिथे त्यांनी चौथ्या फेरीपर्यंत धडक मारली होती. याच वर्षी 1964 साली भारत सरकारने त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले होते. महाराष्ट्र सरकारतर्फे त्यांच्या कुस्ती क्षेत्रातील योगदानाबद्दल 1982 मध्ये शिवछत्रपती पुरस्काराने गौरवले आहे.
कोणत्याही मल्लाची कारकीर्द खूप कमी असते. उमेदीच्या अल्पशा कालावधीत विजेसारखे चमकून दीर्घकाळ लोकांच्या स्मरणात राहावे लागते. कुस्ती सोडल्यानंतर बहुतेक मल्ल आपल्या पारंपरिक व्यवसायात गुंतून जातात. गणपतराव आंदळकर यांनी मात्र लाल मातीची संगत सोडली नाही. 1967 पासून मोतीबाग तालमीत कुस्ती प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडताना त्यांनी शेकडो नामवंत मल्ल घडवले.
स्पर्धात्मक कारकिर्दीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी नवोदित मल्लांना प्रशिक्षण दिले. त्यात महान भारत केसरी रूस्तम-ए- हिंद दादू चौगुले, महाराष्ट्र केसरी चंबा मुत्नाळ, अॅग्नेल निग्रो, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, संभाजी वरुटे, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता रामचंद्र सारंग, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील ही मल्लांची नामावलीवरून त्यांच्या वस्तादगिरीची कल्पना येऊ शकते. फक्ते शंभर रुपये मासिक शुल्क आकारणार्या या तालमीत आंतरराष्ट्रीय मॅट्सचे मैदान आहे. महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय मॅट्स प्रथम आणण्याचे श्रेय त्यांनाच दिले जाते. पहिलवानास तल्लख बुद्धीचीही आवश्यकता असते या तत्त्वाचा त्यांनी सतत पाठपुरावा केला आहे. आपल्या तालमीत येणारे विद्यार्थी शैक्षणिक आघाडीवर कमी पडणार नाहीत याची काळजी ते घेतात. वयाची ऐंशी वर्षे उलटली तरी दर सायंकाळी स्वत: ते मैदानात येऊन मल्लांना विविध डावपेच शिकविण्यास येतात.
हिंदकेसरी गणपत आंदळकर हे नाव कुस्तीच्या इतिहासात एकमेवव्दितीय अर्जूनवीर म्हणून सतत प्रेरक ठरले आहे. मातीवरील कुस्तीचा सर्वोच्च हिंदकेसरी किताब, आशियाई सुवर्ण पदक, ऑलिम्पिक प्रतिनिधित्व आणि अर्जून पुरस्कार प्राप्त झालेले आंदळकर हे महाराष्ट्रातील एकमेव कुस्तीवीर आहेत.