आयपीएल २०२६ मध्ये सनरायझर्स हैद्राबादचे नेतृत्व ईशान किशन करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने आतापर्यंत उत्तम कामगिरी केली आहे. त्यांचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स दुखापतीमुळे सुरूवातीच्या काही सामन्यांना मुकला असून त्याच्या अनुपस्थितीत ईशानला कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. आता कमिन्स परतला असून ईशानेच संघाचे नेतृत्व करावे असे अनेक भारतीय दिग्गजांनी म्हटले आहे.
हरभजन सिंग आणि भारतीय संघाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांच्या मते कमिन्सच्या संघ पुनरागमनानंतरही ईशानेच नेतृत्वपद भुषवावे, असे मत व्यक्त केले आहे.
कमिन्स दुखापतीमुळे टी२० विश्वचषक २०२६ मध्येही खेळला नव्हता आणि आता सुरू असलेल्या आयपीएल २०२६ च्या सुरूवातीच्या काही सामन्यांनाही मुकला आहे. तो भारतात परतला असून जयपूरमध्ये शनिवारी (२५ एप्रिल) राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी त्याचे पुनरागमन होऊ शकते.
हरभजनने जियोस्टारच्या ‘चॅम्पियन्सवाली कमेंट्री’मध्ये कमिन्सच्या पुनरागमनानंतरही एसआरएचने ईशानला कर्णधारपदी कायम का ठेवावे, याबद्दल सांगितले आहे. यावर तो म्हणाला, “कमिन्स परत आला तरी एसआरएचने ईशानला नेतृत्वापदी कायम ठेवावे. हा निर्णय वादग्रस्त असून जर संघ एका तरुण कर्णधाराला पाठिंबा देत असेल, तर त्यांनी त्यालाच कायम ठेवावे. कमिन्सने २०२४ मध्ये संघाला अंतिम फेरीत पोहोचवले होते, यामुळे त्याच्या नेतृत्वाबाबत शंका नाही. सद्यस्थिती आणि संघाची कामगिरी पाहता ईशानला कायम ठेवणे उत्तम. त्याच्या नेतृत्वाखाली संघ चांगली कामगिरी करत असून गोलंदाजी आणि इतर खेळाडूंनी त्याच्यासोबत चांगला ताळमेळ साधला आहे. त्यालाच नेतृत्वसाठी कायम ठेवले तर संघाला फायदाच होणार आहे.”
हरभजनच्या या वक्तव्याला बांगर यांनीही समर्थन दिले आहे. ते म्हणाले, “कर्णधार म्हणून गोलंदाजांचा वापर कसा करावा हे त्याने दाखवून दिले आहे. कोणत्या फलंदाजाविरुद्ध कोणत्या गोलंदाजाला आणावे हे त्याला माहित आहे. तो मैदानावर योग्य निर्णय घेतो आणि कोणत्याही दबावाला बळी पडत नाही. दिल्लीविरुद्ध त्याने फिरकी गोलंदाजांचा वापर केला आणि ते यशस्वी ठरले. त्यामुळे मलाही वाटते की कमिन्स आला तरी ईशानेच संघाचे नेतृत्व करावे.”
आयपीएलच्या या १९ व्या हंगामात एसआरएचने आतापर्यंत ७ सामने खेळले असून त्यातील चार सामने जिंकले आणि तीन सामने गमावले आहे. ते गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहेत.






