-प्रणाली कोद्रे
तू ७१ वे आंतरराष्ट्रीय शतक ठोकलं आणि सारं क्रिकेट जगत अचानक जिवंत झालं. खरंतर आकड्यात सांगायचं झालं तर तू १००० दिवस उलटून गेले तरी ७० वरून ७१ व्या शतकाकडे जात नव्हता. अनेकदा तर असं झालं की तू जवळ पोहचलास आणि तरीही म्हणतात ना ‘सो क्लोज येट सो फार’ तसं काहीसं तुझं झालं होतं. या १००० दिवसांमध्ये सुरुवातीला वाटलं काही नाही होईल, पण ती प्रतिक्षा इतकी वाढली की आता ७१ वे शतक म्हणजे स्वप्नच ठरणार की काय अशी भीती वाटायला लागली होती, पण म्हणतात ना सर्वोत्तम गोष्टी अनपेक्षितरित्या घडतात, तसंच काहीसं झालं आणि कोणालाही अपेक्षित नसताना तुझं ७१ वे शतक साकारलं गेलं. विशेष म्हणजे हे शतक यासाठीही खास की आंतरराष्ट्रीय टी२०मधील हे तुझं पहिलेच शतक. त्यामुळे तुझ्या फॉर्मवर शंका उपस्थित करण्यांना तू एकदम झोकात, पण सणसणीत चपराक दिली.
खरंतर सारं क्रिकेटविश्व सध्या तुझ्याबद्दल बोलंतय, तसं तू कधी चर्चेत नाही, असं झालं नाही, पण तरी गेल्या काही महिन्यात तूझा हरवलेला फॉर्म हाच चर्चेचा विषय असायचं याचं वाईट वाटतं. पण खरंतर तू कधी आऊट ऑफ फॉर्म नव्हता रे, तू गेल्या दोन वर्षात खूप अर्धशतकं केलीच की. तूही हे बोलून दाखवलंस की मी ५०-६० धावा करायचो, तरी ते पुरेसे वाटत नव्हते. पण कसंय ना तू जे काही करून ठेवलंय, त्याच्यासमोर तू शतक केलं, तरच तू फॉर्ममध्ये आहेस अशी आमच्या क्रिकेट चाहत्यांचा समज असायचा. इतकी तू आम्हाला तुझ्या शतकांची सवय लावली होतीस आणि याच सवयीमुळे कदाचीत तुला गेल्या दोन वर्षात जरा जास्तच बोलणी ऐकावी लागली. मला माहितीये तुला त्याचा खूप त्रासही झाला आणि तो आम्ही कदाचीत कधी समजू शकणारही नाही.
तू प्रयत्न केले नाहीस, असं नाही, पण काही केल्या होत नव्हतं. अखेर तू घेतलेल्या त्या ६ आठवड्यांच्या ब्रेकमध्ये काय जादू झाली माहित नाही, पण आम्हाला आमचा जुना विराट अचानक सापडला. तू आशिया चषकात सुरुवातीलाच शतक केलं असं नाही, पण तरी तुझ्या खेळींमध्ये तुझा जुना फॉर्म जाणवत होता, हे नक्की. तू त्यादिवशी म्हणाला ना की तूम्ही काहीही केलं तरी त्या ईश्वराला जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट द्यायची असते, तेव्हाच तो देतो, तू असंही म्हणाला की मी फक्त माझ्या खेळाचा आनंद घेतला, खेळ समजून घेतला आणि यापूर्वीच खुप काही मिळालंय. खरं सांगू तुझी ही खेळी पाहुन मला एकच श्लोक आठवला, तो म्हणजे ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’. खंरच तू यावेळी खऱ्याअर्थाने तुझा खेळ करत होता असं वाटलं आणि कदाचीत म्हणूनच तुझ्या प्रयत्नांचं फळ अनपेक्षितरित्या तुलाच नाही, तर तुझ्या लाखो-करोडो चाहत्यांना ७१ व्या शतकाच्या रुपात मिळालं.
मला माहितीये हे जरा जास्तच इमोशनल होतंय ना. पण यार तू ते इमोशन कमावलंयस रे. अगदी खरं सांगू मी ना काल-परवाच विचार करत होते की क्रिकेटची मजाच येत नाहीये पण का? याचं उत्तर तसं फार मिळत नव्हतं. म्हणजे टीम इंडिया गेल्या काही वर्षात काही वाईट खेळली, असं नाही, पण तरी काहीतरी मिस करत होते, इतकं नक्की. त्यामुळे जिंकल्याचा आनंद आणि पराभवाबद्दल वाईट वाटणंही बंद झालं होतं. पण अखेर ते उत्तर तू दिलंस. तुझं शतक झालं आणि पुन्हा एकदा त्याच जुन्या भावना जाग्या झाल्या आणि खरंतर हुश्श झालं की माझ्यातलं क्रिकेटचं प्रेम संपलेलं नाही. तूझं शतक झालं आणि क्रिकेट पुन्हा पुर्वपदावर आल्यासारखं वाटलं. मला वाटतं यातच तुझ्या ७१ व्या शतकाचं काय महत्त्व असेल, हे तुला समजलं असेल. बाकी तू खेळत राहा… आणि हो महत्त्वाचं म्हणजे तुझ्यातल्या आत्ताच्या विराटची मॅच्युरिटी आणि जुन्या विराटचा फॉर्म यांची सांगड घालत असाच खेळत रहा… तू आनंद घेत राहा आणि आनंद देतही रहा…
तूझीच एक चाहती