आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी (18 सप्टेंबर) टी20 खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर केली. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोननं आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे क्रमवारीत मोठी झेप घेतली असून तो अव्वल क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू बनला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच संपलेल्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत लिव्हिंगस्टोननं बॅट आणि बॉलनं अप्रतिम कामगिरी केली होती. लिव्हिंगस्टोननं दोन सामन्यात 124 धावा केल्या आणि पाच विकेट घेतल्या. लियाम लिव्हिंगस्टोननं दुसऱ्या सामन्यात 47 चेंडूत 87 धावांची खेळी खेळली होती. यात 6 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. त्याच्या खेळीमुळे इंग्लंडनं 193 धावांपर्यंत मजल मारली होती.
दोन सामन्यांतील दमदार कामगिरीमुळे लियामनं तब्बल सात स्थानांनी झेप घेतली. त्यानं ऑस्ट्रेलियाच्या मार्कस स्टायनिसला मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे. लिव्हिंगस्टोननं आपल्या कारकिर्दीतील सर्वोच्च रेटिंग गुण (253) मिळवले. स्टॉयनिसची 211 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर घसरण झाली. तर तिसऱ्या स्थानावर झिम्बाब्वेचा सिकंदर रझा आहे. त्याचे 208 रेटिंग गुण आहेत.
अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक पांड्या हा टॉप-10 मधील एकमेव भारतीय खेळाडू आहे. तो 199 रेटिग गुणांसह सातव्या स्थानावर आहे. तर अक्षर पटेल 149 गुणांसह 11व्या स्थानावर आहे.
फलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियन फलंदाज जोस इंग्लिशनं टॉप-10 मध्ये स्थान मिळवलं. त्यानं 13 स्थानांची झेप घेतली असून तो आता 10 व्या क्रमांकावर आला आहे. त्यानं इंग्लंडविरुद्ध 79 धावा केल्या होत्या. फलंदाजांच्या क्रमवारीत ट्रॅव्हिस हेडचं अव्वल स्थान कायम आहे. तर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव दुसऱ्या स्थानावर आहे.
हेही वाचा –
आयपीएल 2025 पूर्वी मोठी घडामोड, रिकी पॉन्टिंगची या संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती
विराटनं महादेवाचं नाव घेत ऑस्ट्रेलियाचा बॅन्ड वाजवला, तर गंभीरनं हनुमान चालिसा ऐकत भारताला पराभवातून वाचवलं!
‘क्रिकेटर्सना फक्त आयपीएल खेळायचे असते, असे…’ गौतम गंभीरचा मोठा खुलासा