एकाच क्लब तर्फे ६०० सामने खेळणे हा एक विक्रम तर आहेच पण क्लबला त्या ६०० सामन्यात ७१% सामने जिंकवून देणे आणि फक्त ११% सामने गमावणे हा सुद्धा १ विक्रम आहे, आणि या विक्रमाचा मानकरी ठरलेला लिओनेल मेस्सी ३ विश्वविक्रमांच्या उंबरठ्यावर उभा आहे.
१. १०० चॅम्पियन्स लीग गोल्स
चॅम्पियन्स लीगच्या ११९ सामन्यात ९७ गोल्स करत मेस्सी फक्त ३ गोल्स लांब आहे आपल्या १०० व्या गोल पासून. असे करणारा तो रोनाल्डो नंतरचा दुसरा खेळाडू ठरेल. रोनाल्डोच्या नावावर १४३ सामन्यात १११ गोल्स आहेत.
२. क्लबसाठी सर्वाधिक गोल्स
बार्सिलोनासाठी आपला ६०० वा सामना खेळणाऱ्या मेस्सीने आजपर्यंत ५२३ गोल्स आपल्या नावे नोंदवले आहेत आणि तो फक्त ३ गोल्स लांब आहे युरोपियन लीगच्या कोणत्याही एका क्लब तर्फे सर्वाधिक गोल्स करण्याच्या विक्रमापासून. हा विक्रम सध्या बायर्न म्युनिकच्या जिर्हाड मुलरच्या नावावर आहे. त्याने १९६५ ते १९७९ दरम्यान बायर्न म्युनिकतर्फे ५२५ गोल्स केले आहेत.
३. सर्वाधिक ला लीगा विजय
बार्सिलोना तर्फे ६०० सामने खेळणाऱ्या मेस्सीने ला लीगा मध्ये ३९३ सामन्यात २९८ विजय मिळवून दिले आहेत. ला लीगा मध्ये सर्वाधिक विजय रियल मद्रिदच्या इकर कॅसिल्लासच्या नावावर आहेत. त्याने आपल्या संघाला तब्बल ३३४ सामन्यात विजय मिळवून दिला आहे.
१०० चॅम्पियन्स लीग गोल्स आणि क्लब तर्फे सर्वाधिक गोल्सचा विक्रम येत्या काही दिवसातच मेस्सी मोडेल हे स्पष्ट आहे.
पण तो ला लीगा मध्ये सर्वाधिक विजयाचा विक्रम येत्या २ वर्षात मोडेल की सध्या असलेल्या त्याच्या मॅन्चेस्टर सिटीच्या ट्रांस्फरच्या अफवा खऱ्या ठरवत प्रिमियर लीग मध्ये जाणार हा पण एक प्रमुख मुद्दा आहे.
मेस्सीने अजूनही बार्सिलोनाच्या करारावर स्वाक्षरी केलेली नाही आणि ट्रांस्फर विंडोसाठी फक्त ५० ते ५५ दिवस शिल्लक आहेत. आज सर्जी रोबर्टो आणि जिरार्ड पिकेच्या करारावर चर्चा झाली त्यात पिके बरोबर सगळे निश्चित झाले आहे तर रोबर्टो बरोबर पुन्हा चर्चा होणार आहे असे सांगण्यात आले आहे पण या दोघांच्या कराराला अजून काही वर्षांचा अवधी आहे तर मेस्सीसाठी फक्त ५० दिवस शिल्लक आहेत.
नचिकेत धारणकर
(टीम महा स्पोर्ट्स)