इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला ९ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. काही दिवसांपूर्वी या हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने नवीन कर्णधाराची नियुक्ती केली. नियमित कर्णधार श्रेयस अय्यरला दुखापत झाल्याने त्याच्या जागी रिषभ पंतची निवड करण्यात आली. यासह आता आगामी हंगामासाठीच्या सगळ्या संघांच्या कर्णधारपदाचे चित्र स्पष्ट झाले आहे. चला तर मग जाणून घेऊया, यंदाच्या हंगामात कोण आहेत आठही संघांचे कर्णधार –
१) मुंबई इंडियन्स –
गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने आजवर मुंबईला तब्बल पाच जेतेपद जिंकवून दिली आहेत. त्यामुळे यंदाच्या हंगामातही मुंबईच्या कर्णधारपदी तोच कायम आहे.
२) चेन्नई सुपर किंग्ज –
एमएस धोनी हा आयपीएलच नाही तर जागतिक क्रिकेटमधील एक सर्वात यशस्वी आणि चतुर कर्णधार मानला जातो. मागील आयपीएल हंगामात चेन्नईच्या संघाला खरंतर लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात आली नव्हती. तसेच धोनी कारकिर्दीच्या उत्तरार्धाकडे जात असल्याने कदाचित तो निवृत्ती घेऊन नव्या दमाच्या खेळाडूकडे संघाची धुरा देईल, असे सगळ्यांना वाटले होते. मात्र असे काहीही घडले नसून, धोनीच चेन्नईच्या कर्णधारपदी कायम आहे.
३) राजस्थान रॉयल्स –
यंदाच्या हंगामात राजस्थानच्या नेतृत्वाच्या बाबतीत अनपेक्षित निर्णय घेत सगळ्यांनाच धक्का दिला. त्यांनी ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव स्मिथ कडून कर्णधारपद काढून घेत त्याला संघातून देखील नारळ दिला. आणि त्यानंतर भारताचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसनकडे संघाची धुरा दिली. आयपीएलमध्ये आता संजू पहिल्यांदाच कर्णधारपद सांभाळताना दिसेल.
४) कोलकाता नाइट रायडर्स –
मागील हंगामाच्या सुरुवातीला कोलकाताच्या संघाचे कर्णधारपद दिनेश कार्तिक कडे होते. मात्र हंगामाच्या मध्यात नेतृत्वबदल करत त्यांनी इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार ओएन मॉर्गन याच्याकडे कर्णधारपद सोपवले. याचा विशेष फायदा त्यांना मागील हंगामात झाला नसला तरी यंदा त्यालाच कर्णधारपदी कायम ठेवण्यात आले आहे.
५) पंजाब किंग्ज –
यंदाच्या हंगामात नवे नाव आणि नव्या जर्सीसह उतरणार्या पंजाबच्या संघाने कर्णधार मात्र जुनाच कायम ठेवला आहे. भारताचा उगवता तारा केएल राहुल पंजाबचे या देखील हंगामात त्यांचे नेतृत्व सांभाळताना दिसेल.
६) दिल्ली कॅपिटल्स –
दिल्लीच्या संघाला यंदा श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे चांगलाच फटका बसला. कारण त्याच्या नेतृत्वाखाली युवा संघाची बांधणी त्यांनी गेल्या दोन वर्षात केली होती. मात्र आता पूर्ण हंगामात श्रेयस नसल्याने आक्रमक फलंदाज व यष्टीरक्षक रिषभ पंत दिल्लीच्या नेतृत्वाची कमान सांभाळेल.
७) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर –
भारतीय संघाचा कर्णधार असलेला दिग्गज फलंदाज विराट कोहली आयपीएलमध्ये बंगलोरच्या संघाचाही कर्णधार आहे. खरंतर कोहलीला कर्णधार म्हणून बंगलोरला एकही आयपीएल विजेतेपद जिंकवून देता आलेले नाही. मात्र तरीही संघ मालकांनी त्याच्यावर विश्वास कायम ठेवत कर्णधारपद त्याच्याचकडे ठेवले आहे.
८) सनरायझर्स हैद्राबाद –
ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर हैद्राबादच्या संघाचे नेतृत्व करतो. दोन वर्षांपूर्वी त्याच्यावर चेंडू छेडछाड प्रकरणी बंदी असतांना न्यूझीलंडच्या केन विलियम्सनने संघाचे नेतृत्व देण्यात आले होते. मात्र वॉर्नर परत आल्यावर कर्णधारपदासाठी तोच आमची प्रथम पसंती असल्याचे संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे यंदाही वॉर्नरच हैद्राबादचे कर्णधारपद भूषवणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कधीकाळी गॅस सिलेंडर पोहोचवायचा; ‘किंग खान’च्या केकेआरची पडली नजर आणि एका रात्रीत पालटलं आयुष्य
म्हणून कर्णधार रोहित इतरांपेक्षा वेगळा; सूर्यकुमारने सांगितलं हिटमॅनचं ‘टॉप सिक्रेट’