क्रिकेट हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. तसेच गेल्या काही वर्षात या खेळात खूप प्रगती झाली आहे ज्यामुळे या खेळाची लोकप्रियता आणखी वाढली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद( आयसीसी) नेहमीच हा खेळ जगातील कानाकोपऱ्यात पोहचवण्याचा प्रयत्नात असते. दरम्यान संपूर्ण जगात असे काही क्रिकेट बोर्ड आहेत ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे. तर झिम्बाब्वे, श्रीलंका आणि अफगानिस्तानसारखे काही बोर्ड आहेत,ज्यांची आर्थिक स्थिती नाजूक असते. त्याचा परिणाम खेळाडूंच्या वार्षिक पगारावर पाहायला मिळत असतो.चला तर पाहूया कोण आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक पगार मिळणारे कर्णधार.
८) दिमुथ करुणारत्ने ( श्रीलंका):
गेल्या काही वर्षांमध्ये श्रीलंका क्रिकेटमध्ये अनेक मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. गेल्या चार वर्षात श्रीलंका क्रिकेटने ९ कर्णधारांची बदली केली आहे.तर सध्या दिमुथ करुणारत्ने कसोटी संघाचा आणि दसुन शनाका वनडे संघाचा कर्णधार आहे. नुकत्याच झालेल्या करारानुसार, दिमुथ करुणारत्नेला ५१.०३ लाख रुपये इतका पगार दिला जातो. तर, दसुनला २५ लाख रुपये इतका पगार दिला जातो.
७) बाबर आझम ( पाकिस्तान):
पाकिस्तान संघाचा मुख्य फलंदाज बाबर आझम याने गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तान संघासाठी अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याला २०१९ मध्ये मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पाकिस्तान संघाचे नेतृत्वपद देण्यात आले होते. बाबर आझम हा पाकिस्तान संघातील ‘ए’ श्रेणीचा क्रिकेटपटू आहे. त्यामुळे त्याला वर्षाला ६२.४० लाख रुपये पगार म्हणून दिला जातो.
६) कायरन पोलार्ड, क्रेग ब्रेथवेट ( वेस्टइंडिज):
गेल्या काही वर्षांपासून क्रेग ब्रेथवेट हा वेस्ट इंडिजच्या कसोटी संघांचे नेतृत्व करतोय. तर वनडे आणि टी२० संघाची जबाबदारी कायरन पोलार्डच्या हाती देण्यात आली आहे. पोलार्डला वनडे आणि टी२० संघाचे नेतृत्व करण्यासाठी १.७३ कोटी रुपये दिले जातात. तर, ब्रेथवेटला कसोटी संघाचे नेतृत्व करण्यासाठी १.३९ कोटी रुपये दिले जातात.
५) केन विलियम्सन ( न्यूझीलंड):
न्यूझीलंड संघाचा अनुभवी फलंदाज केन विलियम्सन याने गेली अनेक वर्ष आपल्या अप्रतिम फलंदाजीने न्यूझीलंड संघाला विजय मिळवून दिले आहे. त्याला न्यूझीलंड संघाच्या तिन्ही स्वरूपाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. केनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाने आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाला पराभूत करून जेतेपद पटकावले होते. तसेच वनडे आणि टी२० मध्ये देखील न्यूझीलंड संघाने अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याला या संघाचे नेतृत्व करण्यासाठी वर्षाला १.७७ कोटी रुपये दिले जातात.
४) डीन एल्गर, टेंबा बवुमा ( दक्षिण आफ्रिका):
फाफ डू प्लेसीसने कर्णधार पदावरून राजीनामा दिल्यानंतर २०२० मध्ये क्विंटन डी कॉकला संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. परंतु एकाच वर्षात त्याला कर्णधार पदावरून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर टेंबा बवुमाला वनडे आणि टी२० संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. तर, डीन एल्गरला कसोटी संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. एल्गरला कसोटी संघाचे नेतृत्व करण्यासाठी ३.२ कोटी आणि बवुमाला २.५ कोटी रुपये दिले जातात.
३) ऍरॉन फिंच, टीम पेन ( ऑस्ट्रेलिया):
गेल्या काही वर्षांपासून ऍरॉन फिंच हा ऑस्ट्रेलियाच्या वनडे आणि टी२० संघाचे नेतृत्व करत आहे. तर स्टीव्ह स्मिथला कर्णधार पदावरून काढल्यानंतर टीम पेनच्या हाती ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाची धुरा देण्यात आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया हा सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डांपैकी आहे. नवीन करारानुसार, फिंचला ४.८७ कोटी रुपये दिले जातात, तर, पेनला देखील ४.८७ कोटी रुपये दिले जातात.
२)विराट कोहली ( भारत):
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. त्यामुळे क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या विराट कोहलीला ७ कोटी रुपये दिले जातात. यासह तो आयपीएल, जाहिरातींमधून देखील कोट्यावधींची कमाई करतो.
१) जो रूट, ओएन मॉर्गन ( इंग्लंड):
अनेकांना असे वाटत असेल की, विराट कोहली सर्वाधिक पगार मिळवणाऱ्या कर्णधारांच्या यादीत सर्वोच्च स्थानी असेल. परंतु हा तुमचा गैरसमज आहे. सर्वाधिक पगार मिळवणाऱ्या कर्णधारांच्या यादीत जो रूट सर्वोच्च स्थानी आहे. इंग्लंडच्या कसोटी संघाचे नेतृत्व करणाऱ्या जो रुटला ८.९७ कोटी रुपये दिले जातात. तर इंग्लंडच्या वनडे आणि टी२० संघाचे नेतृत्व करणाऱ्या ओएन मॉर्गनला १.७५ कोटी रुपये दिले जातात.






