जगभरातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय टी२० लीग अर्थात आयपीएलची सुरुवात २००८ साली झाली होती. आतापर्यंत आयपीएलचे १२ हंगाम पार पडले आहेत. तर, आयपीएलच्या १३व्या हंगामाची सुरुवात १९ सप्टेंबरपासून होणार आहे. २०-२० षटकांच्या या लीगमध्ये क्रिकेटपटू उत्तम प्रदर्शन करण्याच्या प्रयत्नात असतात. बऱ्याचदा फलंदाज विरुद्ध संघातील गोलंदाजांच्या तोंडचे पाणी पळवताना दिसतात. परिणामत: संघ अगदी २०० धावांचाही टप्पा पार करताना दिसतो.
आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला २२३ धावांचे आव्हान दिले होते. १८ एप्रिल २००८ रोजी झालेल्या या सामन्यात ब्रेंडन मॅक्युलमने शतकीय खेळी केली होती. त्यानंतर अनेक संघांनी २०० धावांचा आकडा पार करण्याचा कारनामा केला.
परंतु, याबाबतीत विराट कोहली कर्णधार असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाची आकडेवारी सर्वांची बोलती बंद करण्याजोगी आहे. कारण, आयपीएल इतिहासात सर्वाधिकवेळा २०० पेक्षा जास्त धावांचा आकडा पार करण्याचा विक्रम आरसीबी संघाच्या नावावर आहे. तर, आयपीएलमध्ये विरुद्ध संघाला सर्वाधिक धावांचे आव्हान देणाऱ्या संघांच्या यादीत आरसीबी अव्वल स्थानावर विराजमान आहे. २३ एप्रिल २०१३ला पुणे वॉरियर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात आरसीबीने ५ बाद २६३ धावा केल्या होत्या. या आयपीएल इतिहासात कोणत्याही संघाने एका डावात केलेल्या सर्वाधिक धावा आहेत.
या लेखात आयपीएलमध्ये कोणकोणत्या संघांनी कितीवेळा २०० धावांचा आकडा पार केला आहे, याची माहिती देण्यात आली आहे. List Of IPL Teams With Maximum No. Of 200 Scores –
१. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (१८ वेळा) –
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हा असा संघ आहे, ज्यांनी २००८ पासून ते आतापर्यंत एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही. असे असले तरी, विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील या संघाने आयपीएल इतिहासात सर्वाधिकवेळा २०० धावांचा आकडा पार करण्याचा विक्रम केला आहे. आतापर्यंत तब्बल १८वेळा आरसीबीने विरुद्ध संघाला २००पेक्षा जास्त धावांचे आव्हान दिले आहे.
आरसीबीची सर्वात मोठी धावसंख्या ही ५ बाद २६३ धावा इतकी आहे. २३ एप्रिल २०१३ला पुणे वॉरियर्स संघाविरुद्ध त्यांनी हा पराक्रम केला होता. यावेळी ख्रिस गेलने (नाबाद १७५) आयपीएल इतिहासात सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रमही केला होता.
२. चेन्नई सुपर किंग्स (१६ वेळा) –
एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपर किंग्स संघाने आतापर्यंत ३ वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. सीएसकेने खेळलेल्या १० हंगामांमध्ये त्यांनी १६ वेळा २०० पेक्षा जास्त धावा करण्याचा पराक्रम केला आहे. सीएसकेची सर्वात मोठी धावसंख्या ही ५ बाद २४६ धावा इतकी आहे, जो त्यांनी ३ एप्रिल २०१०ला राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध केला होता.
तसेच, सीएसकेने त्यांच्या आयपीएलची दमदार सुरुवात केली होती. १९ एप्रिल २००८ रोजी आपल्या पहिल्याच सामन्यात सीएसकेने किंग्स इलेव्हन पंजाबला २४० धावांचे भलेमोठे आव्हान दिले होते.
३. किंग्स इलेव्हन पंजाब (१२ वेळा) –
या यादीत तिसरा क्रमांक लागतो तो किंग्स इलेव्हन पंजाब या संघाचा. किंग्स इलेव्हन पंजाबने २०० धावांचा आकडा त्यांच्या पहिल्याच सामन्यात पार केला होता. सीएसकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबने २०७-४ धावा केल्या होत्या. असे असले तरी, पंजाबने तो सामना गमावला होता.
पंजाबची आयपीएलमधील सर्वात मोठी धावसंख्या ही २३२-२ इतकी आहे. १७ मे २०११ रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध धरमशाला येथील सामन्यात त्यांनी हा पराक्रम केला होता.
४. मुंबई इंडियन्स (११ वेळा) –
४ वेळा आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत ११वेळा २०० धावांचा आकडा पार केला आहे. सर्वप्रथम २३ एप्रिल २००८ रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध झालेल्या सामन्यात त्यांनी ७ बाद २०२ धावा केल्या होत्या. मुंबई इंडियन्सची सर्वाधिक धावसंख्या हा २२३-६ इतकी आहे, जी त्यांनी ११ मे २०१७ ला किंग्स इलेव्हन पंजाबने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना केली होती. तरीही मुंबई इंडियन्सने तो सामना गमावला लागला होता.
५. कोलकाता नाईट रायडर्स (११ वेळा) –
२ वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकवणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सनेही मुंबई इंडियन्सप्रमाणे ११ वेळा २०० धावांचा आकडा पार केला आहे. केकेआरने १८ एप्रिल २००८ ला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध झालेल्या सामन्यात पहिल्यांदा २०० पेक्षा जास्त धावा करण्याचा पराक्रम केला होता. त्यावेळी त्यांनी ३ विकेट्स गमावत २२२ धावा केल्या होत्या. आयपीएल इतिहासात केकेआरची सर्वाधिक धावसंख्या ही ६ बाद २४५ धावा इतकी आहे. जी त्यांनी २०१८ला किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध केला होती.
६. सनराइजर्स हैद्राबाद (१० वेळा) –
सनराइजर्स हैद्राबादने २०१३ साली आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. २०१६ साली आयपीएलच्या विजेतेपदाचा मान मिळवणाऱ्या हैद्राबाद संघाने आतापर्यंत १० वेळा २०० धावांचा आकडा पार केला आहे. मे २०१४ला त्यांनी पहिल्यांदा हा कारनामा केला होता. किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध हैद्राबादने ५ विकेट्स गमावत २०५ धावा केल्या होत्या. तसेच त्यांचा सर्वाधिक धावसंख्या ही २३१-२ इतकी आहे, जी त्यांनी ३१ मार्च २०१९ला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध केली होती.
७. राजस्थान रॉयल्स (७ वेळा) –
आयपीएल इतिहासात सर्वाधिकवेळा २०० धावांचा आकडा पार करण्याऱ्या संघांच्या यादीत राजस्थान रॉयल्स संघाचा सातवा क्रमांक लागतो. पहिल्याच हंगामात आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरणाऱ्या राजस्थान संघाने आतापर्यंत ७ वेळा २००पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. २४ एप्रिल २००८ला डेक्कन चार्जर्सविरुद्धच्या सामन्यात त्यांनी ७ विकेट्स गमावत २१७ धावा केल्या होत्या. जर राजस्थान संघाच्या आयपीएल इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येविषयी पाहायचे झाले तर, २०१०ला सीएसकेविरुद्ध त्यांनी २२३ धावा केल्या होत्या. हीच त्यांची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्ये आहे.
८. दिल्ली कॅपिटल्स (६ वेळा) –
दिल्ली कॅपिटल्स हा संघ आयपीएल इतिहासात सर्वाधिकवेळा २०० धावांचा आकडा पार करणाऱ्या संघांच्या यादीत सर्वात शेवटी येतो. त्यांनी आतापर्यंत ६ वेळा २०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. २३ एप्रिल २०११ला किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध त्यांनी ४ विकेट्स गमावत २३१ धावा केल्या होत्या. हीच त्यांची आयपीएल इतिहासातील सर्वाधिक धावसंख्यादेखील आहे. विशेष म्हणजे, दिल्ली कॅपिटल्स संघाने ६ पैकी ४ वेळा दिल्लीतील मैदानावरच २००पेक्षा जास्त धावा केल्या होत्या.
ट्रेंडिंग लेख –
४०० पेक्षा जास्त टी२० सामने खेळणारे ३ खेळाडू; तिघेही आहेत एकाच संघातील
भारताविरुद्ध वनडेत सर्वाधिक शतक ठोकणारे ४ फलंदाज
भारताचे ३ दिग्गज खेळाडू ज्यांना कधीच मिळाला नाही अपेक्षित सन्मान…