नुकताच इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा साखळी फेरी सामन्यांचा टप्पा पूर्ण झाला आहे. सुरुवातीचे २९ सामने भारतात पार पडल्यानंतर कोरोनामुळे उर्वरित हंगाम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर राहिलेल्या सामन्यांचे आयोजन युएईत करण्यात आले होते. ८ ऑक्टोबर रोजी या साखळी फेरी सामन्यांचा थरार संपला आहे आणि आयपीएलला यंदाचे प्लेऑफमधील ४ पात्र संघही मिळाले आहेत. यामध्ये दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांचा समावेश आहे.
दरवर्षी आयपीएलमध्ये सुरुवातीला साखळी सामने खेळवले जातात. त्यानंतर प्लेऑफ सामने व शेवटी अंतिम सामना होतो. साखळी फेरीअंती गुणतालिकेत टॉप-४ मध्ये राहणाऱ्या संघांना प्लेऑफमध्ये प्रवेश मिळतो. साखळी फेरी सामन्यानंतर रंगणाऱ्या प्लेऑफ सामन्यांमध्ये सुरुवातीला पहिला क्वालिफायर सामना खेळवला जातो. गुणतालिकेत टॉप-२ वर राहणाऱ्या संघांमध्ये हा सामना होतो. यातील विजयी संघ थेट अंतिम सामन्यात धडक मारतो. तर पराभूत झालेल्या संघाला अजून एक संधी मिळते.
तर गुणातालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या स्थानांवरील संघामध्ये एलिमिनेटर सामना होतो. यातील विजेता संघ दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पहिल्या क्लालिफायर सामन्यातील पराभूत झालेल्या संघासोबत खेळतो आणि या सामन्यातील विजेत्याला अंतिम सामन्यात प्रवेश मिळतो.
थोडक्यात सांगायचे झाल्यास, आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी संघांना प्लेऑफसाठी पात्र ठरणे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे दरवर्षी सहभागी आयपीएल फ्रँचायझी साखळी फेरीत त्यांचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करत प्लेऑफमध्ये धडक मारण्यासाठी प्रयत्नशील असतात. दरवर्षीप्रमाणे आयपीएल २०२१ चेही प्लेऑफमधील पात्र संघ निश्चित झाले आहेत. याच धर्तीवर आम्ही आयपीएलच्या १४ हंगामांच्या इतिहासात प्रत्येक वर्षी प्लेऑफमध्ये पात्र ठरलेल्या संघांची यादी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
आयपीएलच्या प्रत्येक हंगामातील प्लेऑफमधील पात्र संघ
२००८- राजस्थान, पंजाब, चेन्नई, दिल्ली
२००९- दिल्ली, चेन्नई, बेंगलोर, डेक्कन
२०१०- मुंबई, डेक्कन, चेन्नई, बेंगलोर
२०११- बेंगलोर, चेन्नई, मुंबई, कोलकाता
२०१२- दिल्ली, कोलकाता, मुंबई चेन्नई
२०१३- चेन्नई, मुंबई, राजस्थान, हैदराबाद
२०१४- पंजाब, कोलकाता, चेन्नई, मुंबई
२०१५- चेन्नई, मुंबई, बेंगलोर, राजस्थान
२०१६- गुजरात, बेंगलोर, हैदराबाद, कोलकाता
२०१७- मुंबई, पुणे, हैदराबाद, कोलकाता
२०१८- हैदराबाद, चेन्नई, कोलकाता, राजस्थान
२०१९- मुंबई, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद
२०२०- मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बेंगलोर
२०२१- दिल्ली, चेन्नई, बेंगलोर, कोलकाता
महत्त्वाच्या बातम्या-
पंचांचा ‘तो’ निर्णय मुंबईच्या बाजूने लागला आणि बुमराहच्या पत्नीची लक्षवेधी रिऍक्शन, व्हिडिओ व्हायरल
मुंबई इंडियन्सविरुद्ध का खेळला नाही विलियम्सन? प्रभावी कर्णधार पांडेने सांगितले कारण
गाडी क्रमांक १५५२…! विजयानंतरही मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून ‘आऊट’, चाहत्यांकडून मीम्सचा वर्षाव