जर्मनीची मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर लिजलॅज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी विराट कोहलीने तिच्या इंस्टाग्राम फोटोला लाइक केल्यानंतर ती भारतात रातोरात प्रसिद्ध झाली होती. आता लिजलॅजने त्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. काही पत्रकारांनी विराट कोहलीविरोधात चुकीची वक्तव्ये करण्यासाठी आणि त्यांची बदनामी करण्यासाठी तिला पैशांची ऑफर दिल्याचा दावा तिने केला आहे.
फिल्मीमंत्राला दिलेल्या मुलाखतीत लिजलॅज म्हणाली की, सुरुवातीला विराट कोहलीने तिचा फोटो लाइक केला हे तिलाच माहिती नव्हते. “लोकांचे फोन आणि मेसेज येऊ लागल्यानंतर मला याची माहिती मिळाली. माझ्या नोटिफिकेशनमध्येही ते मला दिसले नव्हते,” असे तिने सांगितले.
या घटनेनंतर काही तासांतच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर मेसेजचा अक्षरशः पूर आला होता. भारतात ‘लिजलॅज कोण आहे?’ अशी मोठ्या प्रमाणावर सर्चिंग सुरू झाली होती. मात्र जर्मनीत परिस्थिती वेगळी होती. “तिथे लोक ‘विराट कोहली कोण आहे?’ असे विचारत होते, कारण जर्मनीत क्रिकेट फार लोकप्रिय नाही,” असे ती म्हणाली.
लिजलॅजने पुढे सांगितले की, अनेक मीडिया हाऊसेस आणि पत्रकारांनी तिच्याशी संपर्क साधला होता. काहींनी तर विराट कोहलीबद्दल नकारात्मक बोलण्यासाठी दबाव टाकला. “काही पत्रकारांनी मला पैसे देण्याची ऑफर दिली होती, जेणेकरून मी विराटबद्दल चुकीच्या गोष्टी बोलेन. पण मी तसे का करू? तो माझा आवडता क्रिकेटर आहे,” असे तिने स्पष्ट केले.
विराट कोहलीचा बचाव करताना लिजलॅज म्हणाली की, “त्याचा कोणताही चुकीचा हेतू नव्हता. त्यानी फक्त एक फोटो लाइक केला होता. त्याने काहीही चुकीचे केले नाही.” तिने कोहलीला “आशियाचा मेस्सी किंवा रोनाल्डो” असेही संबोधले.
लिजलॅजने स्वतःला आरसीबीची चाहती असल्याचे सांगितले. ती भारताशी संबंधित ट्रॅव्हल कंटेंट पोस्ट करत असते आणि त्यातूनच विराट कोहली तिच्या प्रोफाइलवर आले असावेत, असेही तिने म्हटले.
सध्या लिजलॅज मुंबईत असून ती बॉलिवूडमध्ये करिअर करण्याचा प्रयत्न करत आहे. “मला चांगली भूमिका मिळाली तर मी एका दिवसात हिंदी शिकेन,” असेही तिने सांगितले.





