राष्ट्रीय विद्यापीठ खेळाडू समिती व लोकश्री क्रीडा ज्ञानपीठाने मार्च २०१७ मध्ये सुरू केलेल्या पश्चिम विभागीय विद्यापीठ खेळाडूंच्या पाच टक्के आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात आला आहे. लवकरच येणाऱ्या पोलिस भरतीच्या अगोदर सरकार आरक्षण जाहीर करेल असा विश्वास या समितीला आहे.
अखिल भारतीय पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त खेळाडूंना शासकीय व निमशासकीय नोकरीत पाच टक्के आरक्षण लागू करण्यात यावे म्हणून महाराष्ट्राचे महसूल मंत्री मा श्री बाळासाहेब थोरात, क्रीडा मंत्री सुनील केदार व राज्य क्रीडा मंत्री श्रीमती आदिती तटकरे यांना मा श्री प्रवीण तळोले (उप खजिनदार लोकश्री क्रीडा ज्ञानपीठ) व त्यांच्या सहकारी खेळाडूंच्या वतीने निवेदन देण्यात आले.
याआधी अनेकदा उच्च न्यायालय, क्रीडा संचलनालय, पुणे, आ. महेश लांडगे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, औरंगाबाद, विधानसभेचे अध्यक्ष व प्रा. सागर खळदकर यांनी वारंवार सांगूनही अखिल भारतीय पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त खेळाडूंना शासकीय व निमशासकीय नोकरीत पाच टक्के आरक्षण लागू करण्यात आले नव्हते. मात्र आता हे आरक्षण लवकरात लवकर लागू करावे असी विनंती लोकश्री क्रीडा ज्ञानपीठ, ट्रस्टकडून करण्यात आली आहे.