‘लंडन स्पिरिट वुमन’ संघानं ‘द हंड्रेड वुमन कॉम्पिटिशन 2024’ चं विजेतेपद पटकावलं आहे. लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात त्यांनी वेल्स फायर वुमन संघाचा रोमहर्षक सामन्यात 4 गडी राखून पराभव केला. यासह संघानं प्रथमच द हंड्रेड महिला स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे.
प्रथम फलंदाजी करताना वेल्स फायर महिला संघानं 100 चेंडूत 8 गडी गमावून 115 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, लंडन स्पिरिटनं हे लक्ष्य 98 चेंडूत 6 गडी गमावून गाठलं. लंडनला चॅम्पियन बनवण्यात भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माचं योगदान महत्त्वाचं राहिलं. तिनं अखेरच्या ओव्हरमध्ये षटकार ठोकून संघाला चॅम्पियन बनवलं.
प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या वेल्स फायरसाठी जेस जोनासननं उत्कृष्ट खेळी खेळली. तिनं 41 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीनं 54 धावा केल्या. याशिवाय कर्णधार टॅमी ब्युमॉन्टनं 16 चेंडूत 21 धावा आणि हेली मॅथ्यूजनं 22 धावांची खेळी केली. या दोघींच्या फलंदाजीच्या बळावर संघ 100 धावांच टप्पा गाठण्यात यशस्वी ठरला. लंडन स्पिरिटकडून सारा ग्लेननं अवघ्या 17 धावांत 2 बळी घेतले. तर दीप्ती शर्मानं 23 धावांत 1 बळी घेतला.
लंडन स्पिरिटनं लक्ष्याचा पाठलाग करताना 25 धावांत 2 गडी गमावले. यानंतर मधल्या फळीत जॉर्जिया रेडमननं 32 चेंडूत 34 धावा करत संघाची धुरा सांभाळली. कर्णधार हीदर नाइटनं 18 चेंडूत 24 धावांची खेळी केली. यानंतर डॅनियल गिब्सननं 9 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीनं 22 धावा करत सामना जवळपास एकतर्फी केला. तरीही वेल्सनं झुंज दिली आणि सामना अखेरच्या षटकापर्यंत नेला. अखेर दीप्ती शर्मानं 16 चेंडूत नाबाद 16 धावा करत विजय मिळवून दिला.
दीप्ती शर्मानं या सामन्यात अष्टपैलू कामगिरी केली. वेल्स फायरसाठी शबनम इस्माईलनं 24 धावांत 3 बळी घेतले, ज्यामुळे सामना रोमांचक बनला होता.
London Spirit needed 4 in 3 balls to win The Hundred Final:
Deepti Sharma finished the match with a six….!!! 🫡🔥 pic.twitter.com/M4Jt3bQcyB
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 18, 2024
हेही वाचा –
काय सांगता! तब्बल 11 खेळाडू शून्यावर बाद, तरीही हा विश्वविक्रम कायमच!
दिलदार श्रेयस! रस्त्यावरील गरीब महिलेची मदत करून जिंकलं सर्वांचं मन
“गोलंदाज बॅटमागे लपत नाहीत, ते हुशार असतात”, जसप्रीत बुमराहनं ठोकला कर्णधारपदाचा दावा