इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या जगप्रसिद्ध टी२० लीगने युवा क्रिकेटपटूंना एक मंच उपलब्ध करून दिला आहे. जिथे हे युवा शिलेदार आपली प्रतिभा पूर्ण जगाला दाखवू शकतात. आयपीएलमधील लिलाव प्रक्रियेद्वारे या खेळाडूंची संघात निवड केली जाते. तत्पूर्वी फ्रँचायझी दरवर्षी त्यांच्या टॅलेंट स्काउटद्वारे निवडल्या गेलेल्या काही अनकॅप्ड खेळाडूंना चाचणीसाठी बोलावणे धाडतात. पुढे हेच खेळाडू नेट बॉलर किंवा प्रमुख खेळाडूच्या रूपात संघासोबत जोडले जातात.
काश्मिरचा युवा खेळाडू (Kashmir Cricketer) नासिर लोन (Nasir Lone) यालाही आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) द्वारे चाचणीसाठी (Mumbai Indians Called For Trial) बोलावण्यात आले आहे. आयपीएल २०२२ च्या पाश्वभूमीवर मुंबई संघाने हे पाऊल उचलले आहे. काश्मिरच्या उत्तर भागातील बांदीपुरा जिल्ह्याचा रहिवासी असलेला नासिर याने स्वत यासंदर्भात माहिती दिली आहे.
मुंबईसारख्या आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघाकडून बोलावणे आल्यानंतर नासिरच्या आनंदाला सीमा नव्हती, असे त्याने सांगितले आहे.
“शनिवारी (११ डिसेंबर) दुपारी मला मुंबई इंडियन्स संघाचा कॉल आला आणि त्यांनी मला चाचणीसाठी येण्यासाठी आमंत्रित केले. ही चाचणी १५ डिसेंबर रोजी होणार आहे. कोणत्याही क्रिकेटपटूचे स्वप्न असते की, त्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधित्त्व करावे. मीही एक दिवस भारतीय संघाकडून खेळू इच्छितो आहे. पण तत्पूर्वी आयपीएलसारख्या जगप्रसिद्ध टी२० लीगमधील एखाद्या संघाकडून कोणत्या युवा खेळाडूला संधी मिळणे, त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट असते आणि यासाठी ते खूप मेहनतही करत असतात. माझ्यासाठीही या स्तरावर पोहोचणे एका स्वप्नाप्रमाणे आहे. आज माझे हे स्वप्न पूर्ण झाले आहे,” असे नासिरने सांगितले.
पुढे आपल्या आदर्श क्रिकेटपटूविषयी बोलताना तो म्हणाला की, “क्रिकेटविश्वातील माझा आदर्श क्रिकेटपटू विराट कोहली आहे. मला त्याच्यासोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचे आहे. मी आतापर्यंत फक्त स्थानिक पातळीवरील क्रिकेट सामने खेळले आहेत. पण आता मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन की, मुंबई इंडियन्स संघात माझी निवड व्हावी.”
मुंबई इंडियन्सची नजर असेल प्रतिभाशाली खेळाडूंवर
आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स आयपीएल २०२२ हंगामासाठी रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव या भारतीय खेळाडूंना, तर कायरन पोलार्ड या परदेशी खेळाडूला संघात कायम केले आहे. मुंबई इंडियन्सने ४ खेळाडूंना संघात कायम ठेवताना रोहित शर्मासाठी १६ कोटी, जसप्रीत बुमराहसाठी १२ कोटी, सूर्यकुमार यादवसाठी ८ कोटी आणि पोलार्डसाठी ६ कोटी रुपये मोजले आहेत.
संघाने ४ खेळाडूंना संघात कायम केले असल्याने आता लिलावासाठी संघाकडे ४८ कोटी रुपये शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे आता त्यांची नजर प्रतिभाशाली खेळाडूंना संघात सहभागी करण्यावर असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
“त्यावेळचे अजहरुद्दीन आजही सर्वोत्तम क्षेत्ररक्षक असते”
राष्ट्रीय हॉकी: मणिपूर संघाचा गोलांचा पाऊस, स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी ५ सामन्यात ७४ गोल
बुडत्याचा पाय खोलात! लाजिरवाण्या पराभवानंतर इंग्लंडला आयसीसीचा जोरदार दणका; वाचा सविस्तर