आयसीसीने बुधवारी (30 जुलै) रोजी नवीन रँकिंग यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा टी20मधील क्रमांक 1 चा फलंदाज ठरला आहे. त्याने आयपीएलमध्ये आपल्या जोडीदार ट्रॅव्हिस हेडला मागे टाकत हा मान पटकावला आहे. ट्रॅव्हिस हेडचे गेल्या वर्षभराचे वर्चस्व संपले असून तो दुसऱ्या स्थानी सरकला आहे. अभिषेकने केवळ 17 सामने खेळूनच हा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे.
अभिषेक शर्मा टी20 फलंदाजांच्या मानांकनात यापूर्वी दुसऱ्या स्थानी होते, तर ट्रॅव्हिस हेड गेल्या सुमारे 1 वर्षापासून टी20 तील नंबर 1 फलंदाज म्हणून कायम होते. आता अभिषेकने त्यांचा हा मान हिरावून घेतला आहे. अभिषेककडे 829 रेटिंग पॉइंट्स आहेत, तर हेडकडे 814 पॉइंट्स आहेत.
अभिषेक शर्माने आतापर्यंत 17 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये खेळलेल्या 16 डावांमध्ये त्याने 193.84 च्या स्ट्राइक रेटने 535 धावा केल्या आहेत. टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत त्याच्या नावावर 2 शतके आणि 2 अर्धशतके आहेत.
अभिषेक शर्मा टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावांची खेळी करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध 54 चेंडूंमध्ये 135 धावा फटकावल्या होत्या. 2 फेब्रुवारी 2025 रोजी खेळलेल्या या सामन्यात त्याने 13 षटकार आणि 7 चौकार मारले होते.
याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याने 37 चेंडूंमध्ये शतक झळकावले होते, जे टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीयांकडून झळकावले गेलेले दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जलद शतक आहे. पहिल्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे, ज्याने 35 चेंडूंमध्ये शतक झळकावले होते. रोहितने टी20 फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे.
अभिषेक शर्मा टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणाऱ्या भारतीयांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहेत. ज्या डावात त्यांनी जलद शतक झळकावले, त्याच डावात त्यांनी केवळ 17 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले होते. या यादीत त्यांच्यापुढे केवळ युवराज सिंग आहेत, ज्याने 2007 मध्ये 12 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते.





