पुणे 17 जुलै 2023 – बिशप्स प्रशाला, कॅम्प आणि लॉयला प्रशाला संघांनी एकतर्फी वर्चस्व राखत लॉयला कप आंतरशालेय टाटा ऑटोकॉम्प फुटबॉल स्पर्धेत आपली आगेकूच कायम राखली.
लॉयला प्रशालेच्या मैदानावर सुरु असलेल्या स्पर्धेत सोमवारी चौथ्या दिवशी 14 वर्षांखालील गटात लॉयला प्रशाला संघाने एसएसपीएमएस बोर्डिंग प्रशाला संघाचा 13-0 असा धुव्वा उडवला. पार्थ शिंदेने (32, 25, 33 आणि 35 वे मिनिट) चार गोल करून विजयात महत्वाचा वाटा उचलला. करांशु गजरे (2, 11, 17 वे मिनिट) आणि परम कुलकर्णी (8, 14, 21 वे मिनिट) प्रत्येकी तीन गोल करून त्याला सुरेख साथ केली. अधिकाज सिंगने दोन, तर वेदांत शितोळेने एक गोल केला.
लॉयला प्रशाला संघाने त्यानंतर 16 वर्षांखालील गटात एसएसपीएमएस बोर्डिंग प्रशाला संघाचा 10-3 असा पराभव केला. वेदांत कांबळे (14, 34, 43वे मिनिट) आणि वेदांत गुप्ताने (21, 47, 55वे मिनिट) प्रत्येकी तीन गोल केले. अथर्व सोनावणेने दोन आणि दर्श कासट आणि शुभम चौधरीने एकेक गोल करून त्यांना सुरेख साथ केली. पराभूत संघाकडून श्रीनिवास महालेने दोन, तर हर्ष गवळीने एक गोल केला.
स्पर्धेतील 12 वर्षांखालील गटात शॉन आंग्रेने 15 व्या मिनिटाला नोंदवलेल्या एकमात्र गोलच्या आधारावर लॉयला प्रशालेने एसएसपीएमएस प्रशाला संघाचा 1-0 असा पराभव केला.
बिशप्स प्रशाला संघाने 14 वर्षांखालील गटात विद्या व्हॅली संघावरील 11-0 विजयाने आपल्या मोहिमेस सुरुवात केली. अर्जुन देशपांडे (1,2, 28 वे मिनिट) आणि शिखर शहा (3, 21,23वे मिनिट) यांनी प्रत्येकी तीन गोल केले. त्यांना जोसुहा सोंगाटे, झैद बेग, आर्यन किर्तने, सामुईत कासट आणि दिउयान कौशिक यांनी एकेक गोल करून सुरेख साथ केली.
स्पर्धेतील 16 आणि 12 वर्षांखालील गटात बिशप्स प्रशाला संघाने विद्या व्हॅली संघावर 3-0 अशाच सारख्या फरकाने विजय मिळविला.