श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या महत्त्वाकांक्षी लंका प्रीमियर लीगचा (एलपीएल) अंतिम टप्पा आजपासून सुरू झाला. कोलंबो किंग्स आणि गाले ग्लॅडिएटर्स यांच्या दरम्यान झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात गॉल ग्लॅडिएटर्सने कोलंबो किंग्सचा दोन गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत जागा पटकावली. युवा अष्टपैलू धनंजय लक्षन हा ग्लॅडिएटर्सच्या विजयाचा नायक ठरला. त्याने जबाबदारी खेळ करत २१ चेंडूत नाबाद २२ धावा काढल्या.
कोलंबोने उभारली सन्मानजनक धावसंख्या
हंबनटोटा येथील महिंदा राजपक्षे स्टेडियमवर खेळल्या गेलेले या सामन्यात गॉल ग्लॅडिएटर्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. ग्लॅडिएटर्सच्या गोलंदाजांनी अत्यंत चमकदार कामगिरी करताना कोलंबो संघाच्या फलंदाजांना मोकळेपणाने खेळू दिले नाही. कोलंबो संघाकडून तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आलेल्या डॅनियल बेल-ड्रूमंड याने एकहाती किल्ला लढवत ५३ चेंडूत ७० धावा फटकावल्या. नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या इसुरू उदानाने १९ धावा काढत कोलंबो संघाला १५० धावांपर्यंत मजल मारून देण्यात मदत केली. ग्लॅडिएटर्सकडून लक्षन संदकनने सर्वाधिक ३ तर नुवान तूषारा व धनंजय लक्षन यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
ग्लॅडिएटर्सची खराब सुरुवात
कोलंबोने दिलेल्या १५१ धावांच्या आव्हानासमोर ग्लॅडिएटर्सची सुरुवात निराशाजनक झाली. स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणारा धनुष्का गुणतिलका ११ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला एहसान अली भोपळाही फोडू शकला नाही. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या यष्टीरक्षक आजम खान आणि सलामीवीर कर्णधार भानुका राजपक्षे यांनी कोलंबोच्या गोलंदाजांवर आक्रमण करत चौकार-षटकार मारायला सुरुवात केली. दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी २२ चेंडूत ४० धावांची भागीदारी करत ग्लॅडिएटर्सचा डाव पुढे नेला. १३ चेंडूत २२ धावा काढून, आजम बाद झाल्यानंतरही कर्णधार राजपक्षे याने काही चांगले फटके खेळले. आपला दुसरा स्पेल टाकण्यासाठी आलेल्या अशान प्रियंजनने राजपक्षेला फसवत कोलंबो संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले.
त्यानंतर मात्र, स्पर्धेत चमकदार कामगिरी करत असलेल्या अफगाणिस्तानच्या फिरकीपटू कैस अहमद याने ग्लॅडिएटर्सच्या धावगतीला वेसण घातली. त्याला अनुभवी इसुरू उदानाने योग्य साथ दिली. मात्र, मोहम्मद आमिर व धनंजय लक्षन यांनी प्रत्येकी षटकार आणि चौकार वसूल करत सामन्यात रंगत आणली.
दोन षटकात रोमांच पोहोचला शिखरावर
ग्लॅडिएटर्सला विजयासाठी अखेरच्या दोन षटकांत १७ धावांची गरज होती. कोलंबो संघाकडून इसुरू उदाना गोलंदाजीसाठी तयार होता. मात्र, तो दुखापतीमुळे काही काळ बाहेर असल्याने पंच कुमार धर्मसेना यांनी त्याला गोलंदाजी करण्यास मनाई केली. अशा परिस्थितीत युवा अष्टपैलू तक्षिला डिसिल्वा संघाच्या मदतीला धावून आला. स्पर्धेतील आपले पहिलेच आणि अत्यंत महत्वपूर्ण षटक टाकताना त्याने त्या षटकात फक्त दोन धावा देत एक बळी मिळविला.
अखेरच्या षटकात अनुभवी मात्र दुखापतग्रस्त असलेला इसुरू उदाना गोलंदाजीसाठी आला. पहिल्या दोन चेंडूंवर प्रत्येकी दोन धावा निघाल्यानंतर, धनंजय लक्षनने षटकार मारत सामन्याची उत्कंठा वाढवली. पाचव्या चेंडूवर लक्षण संघाने पहिल्या चेंडूला सामोरे जात चौकार ठोकत ग्लॅडिएटर्सला अंतिम फेरीत जागा मिळवून दिली.
खराब क्षेत्ररक्षण आणि दुखापतीने झाले कोलंबोचे नुकसान
या सामन्यात कोलंबो किंग्सचे तब्बल चार खेळाडू दुखापतग्रस्त झाले. संघाचा कर्णधार एन्जेलो मॅथ्यूज आठव्या षटकात दुखापतग्रस्त होऊन बाहेर पडला तर इसुरू उडादा आणि कैस अहमद यांनी संपूर्ण सामन्यात दुखापतीसह गोलंदाजी केली. अष्टपैलू आंद्रे रसल फलंदाजीनंतर क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नव्हता. अखेरच्या दोन षटकात कैस अहमदने दोन सोपे झेल सोडल्याने ग्लॅडिएटर्सला अंतिम फेरीत नेण्यात हातभार लावला.
उद्या दांबुला वाईकिंग विरुद्ध जाफना स्टॅलियन्स यांच्यात दुसरा उपांत्य सामना होईल. त्या सामन्यातील विजेत्यासह गॉल ग्लॅडिएटर्स अंतिम सामन्यात दोन हात करेल. स्पर्धेचा अंतिम सामना १६ डिसेंबर रोजी खेळला जाईल.
संबधित बातम्या:
– लंका प्रीमियर लीग: उपांत्य फेरीआधी गिब्सने सोडले किंग्सचे प्रशिक्षकपद, हे आहे कारण
– दुःखद! या महान क्रिकेटपटूला झाला पितृशोक, आजारपणामुळे वडिलांचे निधन
– NZvsWI: दुसऱ्या कसोटीतही वेस्ट इंडीजची दयनीय अवस्था; होऊ शकतो डावाने पराभव